मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता देण्याबरोबरच आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केल्यानंतर गुरुवारी रात्रीपासून एसटी कर्मचार्यांनी उपोषण मागे घेतले.
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटीतील सर्व कामगार संघटनांनी एकत्र येत संयुक्त कृती समिती स्थापन करुन बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. उपोषणाच्या पहिल्या दिवशी राज्यातील 11 डेपो पूर्णतः आणि 4 डेपो अंशतः बंद राहिले होते.
त्यामुळे पहिल्या दिवशी उपोषणाचा फारसा परिणाम एसटी च्या वाहतुकीवर झाला नाही. परंतु गुरुवारी पहाटेपासूनच कर्मचारी आक्रमक झाले आणि त्यांनी डेपोतून गाड्या बाहेर पडू दिल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
राज्यातील 250 डेपोंपैकी 190 डेपो दिवसभर बंद राहिले. त्यामुळे प्रवासी वाटेतच अडकून पडले. उपोषण आंदोलनाचा हा दणका बसताच परिवहन मंत्री अनिल परब यांनी दुपारी साडे चार वाजता संयुक्त कृति समितीच्या पदाधिकार्यांसोबत मंत्रालयात बैठक घेत ठोस निर्णय घेतले.
राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाण 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ याबरोबरच वार्षिक वेतनवाढ 2 टक्क्यावरुन 3 टक्के करण्यासंदर्भात आपण सकारात्मक असल्याचे परब यांनी सांगितले. परिणामी कृति समितीने कर्मचार्यांचे उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.