Ashadi Vari 2023 : पाच हजार वारकऱ्यांना मोफत पंढरपूर वारी

येवला : येथून पंढरपूरला बस रवाना होण्यावेळी नामस्मरणात सहभागी झालेले आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, कुदळ महाराज, जाधव महाराज, कुणाल दराडे व वारकरी. (छाया: अविनाश पाटील)
येवला : येथून पंढरपूरला बस रवाना होण्यावेळी नामस्मरणात सहभागी झालेले आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, कुदळ महाराज, जाधव महाराज, कुणाल दराडे व वारकरी. (छाया: अविनाश पाटील)
Published on
Updated on

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

ऐसी चंद्रभागा ऐंसे भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठें ।।

ऐसे संतजन ऐंसे हरिदास । ऐसा नामघोष सांगा कोठे ।।

या अभंगाची यथार्थता पटवून देत येथून सुमारे ९० ते १०० बसेसमधून चार ते पाच हजार विठ्ठलाचे वारकरी गुरुवारी आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी पंढरपूरला रवाना झाले. आमदार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांसाठी या मोफत बसची व्यवस्था करण्यात आली असून, भोजन, फराळ, आरोग्यसेवेसह पंढरपूर येथे मठामध्ये राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यातील भाविकांसाठी मोफत दर्शनवारीचे आयोजन कुणाल दराडे फाउंडेशनच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यासाठी नावनोंदणी करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी पंढरपूरला जाण्यासाठी जमलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत शहराच्या मुख्य मार्गावरून विठुनामाचा घोष करत दिंडी काढण्यात आली. वडगाव येथील भाऊसाहेब जाधव महाराज यांच्यासह त्यांच्या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेतील चिमुकल्यांनी भजन सादर केले. आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, कुणाल दराडे तसेच मीना दराडे यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. आसरा लाॅन्स येथे दिंडी आल्यावर प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी क्षीरसागर, पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या हस्ते संतपूजनाने वारीला प्रारंभ करण्यात आला. प्रत्येक बसमध्ये प्राथमिक उपचारासाठी डॉक्टर, औषधोपचाराचीही व्यवस्था करण्यात आली असून, यासाठी २०० हून अधिक स्वयंसेवक सोबत गेलेले आहेत. बसमधून भाविक रवाना होताना किराणा व्यापारी असोसिएशनचे बाळासाहेब कापसे, दत्ता निकम, नगरसेवक प्रमोद सस्कर, बंडू क्षीरसागर आदींनी फराळाच्या पदार्थांचे वाटप केले. यावेळी विठ्ठल शेलार, पोटे महाराज, अमोल महाराज कोटमे, डॉ. सुधीर जाधव, संजय कासार, दिनेश आव्हाड, नितीन काबरा, हरीश मुंढे, सुनील पवार, समाधान झाल्टे, प्रसाद गुब्बी, सुनील काटवे आदी उपस्थित होते.

आषाढी एकादशीच्या पवित्रदिनी भाविकांना दर्शनाची सोय व्हावी व त्यासाठी आपणही शक्य ती सेवा येवलेकरांसाठी करावी या हेतूने सर्व भाविकांना मोफत दर्शनासाठी घेऊन जाण्याचा हा उपक्रम राबविला आहे. देवाच्या दर्शनाला भाविकांना घेऊन जाण्याचे आमच्या आईचे स्वप्न यानिमित्ताने दराडे बंधूंनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. – किशोर दराडे, आमदार, येवला.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news