नाशिक : प्रत्येक रुग्णालयात लाखोंची धुलाई झाल्याचा संशय | पुढारी

नाशिक : प्रत्येक रुग्णालयात लाखोंची धुलाई झाल्याचा संशय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुण्याच्या बिलांचा गैरव्यवहार समोर आला. यात प्रत्येक रुग्णालयात किमान पाच लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ३० खाटांचे रुग्णालय असतानाही दररोज २०० हून अधिक कपडे धुतल्याचे सांगत ठेकेदाराने शासनाकडे बिल दिल्याचे चौकशीतून समोर येत आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयात किमान पाच लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची चर्चा रंगली आहे.

जिल्ह्यात ३३ ग्रामीण, उपजिल्हा व महिला रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये किमान ३० खाटा असून सर्वाधिक खाटा जिल्हा रुग्णालयात आहे. त्यापैकी बहुतांश रुग्णालयांमध्ये पुर्ण क्षमतेने रुग्ण संख्या नसते. अनेकदा ५ ते १० खाटांवरच रुग्ण उपचार घेत असतात. तरीदेखील या रुग्णालयांमध्ये दररोज २०० हून अधिक कपडे धुतल्याचे संबंधित कंत्राटदार कंपनीने सांगत शासनाकडे बिले सादर केली आहेत. त्यापैकी अनेक बिले मंजूर झाल्याचेही सुत्रांनी सांगितले. त्यामुळे हा गैरव्यवहार कोट्यवधीच्या घरात असून त्यात तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय वर्तवला जात आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थाेरात यांनी मार्च महिन्यात चौकशी समिती नेमली होती. त्यानुसार या समितीने चौकशी करून त्याचा अहवाल बुधवारी (दि.७) जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर करणार आहे. कपडे धुण्याचा कंत्राट परजिल्ह्यातील कंपनीकडे असून तिनेही पोट कंत्राटदार नेमल्याचे बोलले जात आहे. यात जिल्हा रुग्णालयातीलच काही कर्मचारी सहभागी असून त्यापैकी एका कर्मचाऱ्याची सिडकोत लाँड्री असल्याची चर्चा रुग्णालयात रंगली आहे. त्यामुळे सखोलमध्ये तपास केल्यास या गैरव्यवहाराची साखळी समोर येऊन शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूकही टळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

Back to top button