नाशिक : शासकीय रुग्णालयांतील कपड्यांमध्ये ‘धुलाई’  | पुढारी

नाशिक : शासकीय रुग्णालयांतील कपड्यांमध्ये 'धुलाई' 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत असलेल्या जिल्हा, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांमधील कपडे धुण्यातही गैरव्यवहार झाल्याचे उघड होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुणाऱ्या कंत्राटदाराने आकड्यांमध्ये फेरफार करून जादा पैसे घेतल्याचे समेार येत आहे. यासंदर्भात भांडारपाल व ट्रेझरीमार्फत चौकशी सुरू असून, प्राथमिक चौकशीत बिल मंजूर करण्याआधी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले आहे.

जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासोबतच रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. त्यात रुग्णांसाठी लागणारे बेडशीट, उशीचे खोळ, ब्लँकेट्स, चादर, रुग्ण-डाॅक्टरांचे गाऊन, शस्त्रक्रियांसाठी लागणारे कपडे नियमित धुण्यासाठी कंत्राट दिले आहे. दरम्यान, कपडे धुण्याचे बिल देताना केलेल्या तपासणीत धुतलेले कपडे आणि बिलात नमूद केलेल्या कपड्यांची संख्या जुळत नसल्याचे आढळून आले. तसेच बिलांमध्ये खाडाखोडही आढळून आली. त्यामुळे मार्च महिन्यापासून याची चौकशी सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयांमधील परिचारिका जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांच्याकडील कागदपत्रे घेऊन येत आहेत. या कागदपत्रांची छाननी केली जात आहे. याआधीही वस्त्रधुलाईत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर परजिल्ह्यातील कंपनीस वस्त्रधुलाईचे कंत्राट दिले होते. मात्र, त्यातही गैरव्यवहार झाल्याचे समोर येत आहे.

मार्च महिन्यापासून यासंदर्भात चौकशी सुरू आहे. बिलांमध्ये खाडाखोड केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बिलांची शहानिशा केली जात आहे. यात तथ्य आढळून आल्यास संबंधित कंपनीवर कारवाई केली जाईल. तसेच काळ्या यादीत कंपनीचे नाव टाकले जाईल. लवकरच चौकशी पूर्ण होऊन अहवाल येईल.

– डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक

हेही वाचा :

Back to top button