धुळ्यात आमदार रोहित पवार यांच्यासमोरच दोन गटात जोरदार धक्काबुक्की ! | पुढारी

धुळ्यात आमदार रोहित पवार यांच्यासमोरच दोन गटात जोरदार धक्काबुक्की !

धुळे; पुढारी वृत्तसेवा

धुळ्यात राष्ट्रवादीमधील गटबाजी आज आमदार रोहित पवार यांच्यासमोर उफाळून आली. माजी आमदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा फोटो बॅनरवर नसल्यामुळे दोन गटात धक्काबुक्की झाली.

धुळ्यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे आज आगमन झाले. पारोळा रोड चौफुलीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात आमदार पवार यांचे स्वागत केले. हा चौक बॅनर लावून सजवण्यात आला होता. मात्र काही बॅनरवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार अनिल गोटे यांचा फोटो नसल्याची बाब प्रशांत भदाणे या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली.

फोटो लावण्यात आला नसल्याने नाराजी

त्यामुळे भदाने यांनी काही कार्यकर्त्यांसमवेत फोटो लावण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त केली. दरम्यान आमदार रोहित पवार हे तेथे पोहोचल्यानंतर त्यांचे स्वागत करत असतानाच प्रशांत भदाणे यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. माजी आमदार अनिल गोटे हे धुळे विधानसभा मतदारसंघातून तीन वेळेस आमदार झाले असून सध्या ते राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष असताना त्यांचा फोटो महत्त्वाच्या बॅनरवरून त्यांचा फोटो जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याची बाब आमदार पवार यांच्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी राष्ट्रवादी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांनी ही बाब जाणीवपूर्वक झाली नसल्याचा उल्लेख केला. या कारणावरून आमदार पवार यांच्यासमोरच प्रशांत भदाणे आणि कुणाल पवार यांच्यात बाचाबाची सुरू झाली. दरम्यान हा वाद सुरू असतानाच आमदार पवार यांनी एकवीरा मातेचे दर्शन घेण्यासाठी गाडीमध्ये बसून प्रयाण केले. मात्र यानंतर प्रशांत भदाणे आणि कुणाल पवार यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली.

काही कार्यकर्त्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गटांकडून हमरीतुमरी सुरूच होती. दरम्यान, धुळ्यात राष्ट्रवादीमध्ये आमदार अनिल गोटे यांनी प्रवेश केल्यामुळे एका गटामध्ये खदखद आहे. हा वाद पक्षाचे नेते तथा राज्याचे मंत्री जयंत पाटील यांच्या समोर देखील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उफाळून आला होता. पण त्यावर पडदा टाकण्यात आला. आज पुन्हा आमदार रोहित पवार यांच्या समोरच ही गटबाजी उफाळून आल्याने आता यासंदर्भात पक्ष पातळीवरून कशा पद्धतीने दखल घेतली जाते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button