हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रिपद सोडणार ! कोल्हापूरसाठी काय म्हणाले ? | पुढारी

हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रिपद सोडणार ! कोल्हापूरसाठी काय म्हणाले ?

अकोले : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडणार आहेत. त्यांनीच तसे स्पष्ट केले. येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या बाबीला दुजोरा दिला.

आगामी काळात नगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकाचवेळी अनेक निवडणुका होणार आहेत. विधान परिषद निवडणुकीचाही त्यात समावेश आहे. या स्थितीत एक मंत्री दोन जिल्ह्यांकडे कसे लक्ष देऊ शकणार? गृह जिल्हा म्हणून मला कोल्हापूरकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे सांगत जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्री बैठकीत नगर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याबाबत पक्षश्रेष्ठींना विनंती केली होती. कोल्हापूरकडे जास्त लक्ष देता यावे, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले होते. मुश्रीफ शुक्रवारी अकोले तालुक्याच्या दौर्‍यावर होते. त्यांच्या हस्ते सुमारे 12 कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.

पंचायत समिती सभागृहात त्यांनी कोरोनासंदर्भात आढावा बैठकही घेतली. यावेळी पत्रकारांनी मुश्रीफ यांना पालकमंत्रिपद सोडण्याबाबत प्रश्‍न विचारले असता त्यांनी त्याला दुजोरा दिला.

ते म्हणाले की, नगरचे पालकमंत्रिपद सोडण्यासंबंधी मी बैठकीत मागणी केली आहे. नजीकच्या काळात नगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकाचवेळी विविध निवडणुका येत आहेत. दोन्ही जिल्ह्यांत अंतर खूप आहे. त्यामुळे दोन्हीकडे न्याय देता येणार नाही. स्वजिल्हा म्हणून मला कोल्हापूरमध्ये जास्त लक्ष घालणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरच्या पालक मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्‍त करण्याची मागणी केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार

मुश्रीफ म्हणाले की, आघाडी सरकार भक्‍कम आहे, ते कार्यकाळ पूर्ण करेल. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल. काही ठिकाणी अपवाद असेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी महाविकास आघाडी सोडणार असल्याच्या संदर्भात विचारले असता, त्यांनी भाष्य टाळले. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात त्यांना नोटीस दिली असून, 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा केला असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

 

Back to top button