नंदुरबार : तिकीट तपासणीसावर चाकू हल्ला ; धावत्या रेल्वेतील धक्कादायक घटना | पुढारी

नंदुरबार : तिकीट तपासणीसावर चाकू हल्ला ; धावत्या रेल्वेतील धक्कादायक घटना

नंदुरबार : तिकीट दाखवायला सांगितल्याच्या रागातून रेल्वेतील दोन प्रवाशांनी तिकीट तपासणीसावर चाकू हल्ला केल्याची घटना सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील चिंचपाडा येथे घडली.  या हल्ल्यात तिकीट तपासणीस गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी  मिळालेल्या माहितीनुसार,  भुसावळ सुरत एक्सप्रेस (दि. 2) रात्री साडेनऊ वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरत-भुसावळ एक्सप्रेस सायंकाळी साडेपाच वाजता सुरत येथून भुसावळकडे निघाली. ही एक्सप्रेस रात्री सव्वा आठ वाजता नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे स्थानकावर येऊन पोहोचली. नंतर काही प्रवासी या एक्सप्रेसच्या डब्यात चढले. तिकीट तपासणी करीत तिकीट तपासणीस सुधांशू हे त्याचवेळी त्या डब्यात येऊन पोहोचले. त्यांनी प्रवाशांकडे तिकीट तपासणी करताना या प्रवाशांकडे देखील तिकीट मागितले. तथापि तिकीट दाखवायला सांगितल्याचा राग येऊन त्यातील दोन जणांनी चाकू हल्ला केला. यात तिकीट तपासणीस सुधांशू यांच्या हातावर, दंडावर चाकू लागून गंभीर जखमी झाले आहेत.

त्याचवेळी काही प्रवासी त्यांच्या मदतीला धावून आले. त्यामुळे हल्लेखोर धावत्या रेल्वेतून पसार झाले. रात्री साडेनऊ वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस येऊन पोहोचल्यावर जखमी तिकीट तपासणीस यांनी रेल्वे पोलिसांकडे याची माहिती दिली. गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू असल्याचे समजते.

Back to top button