Nashik Niphad : निफाडकरांवर ‘राइट टू पी’ आंदोलनाची वेळ | पुढारी

Nashik Niphad : निफाडकरांवर 'राइट टू पी' आंदोलनाची वेळ

निफाड (जि. नाशिक) : दीपक श्रीवास्तव

‘राइट टू पी’ हा शब्द इंग्रजीची ओळख नसलेल्या आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तसा अनोळखीच म्हणावा लागेल. इतकेच नव्हे तर काहींना हास्यास्पद, तर काहींना किळसवाणाही वाटू शकेल. कारण इंग्रजी भाषेत पी म्हणजे मूत्र आणि राइट टू पी याचा अर्थ होतो मूत्रविसर्जनाचा अधिकार. नागरिकांना जसा शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा अधिकार असतो त्याचप्रमाणे शौच किंवा मूत्र विसर्जनासाठी योग्य त्या सोयी-सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या पाहिजे, हेसुद्धा नागरिकांच्या आरोग्यासाठी गरजेचे असते. शासन या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अनेक ठिकाणी ‘राइट टू पी’ या नावाने आंदोलने केली जातात. कारण मूत्रविसर्जनासाठी सुरक्षित व स्वच्छ जागा उपलब्ध नसेल तर योग्य जागेअभावी नागरिकांना विशेष करून स्त्रियांना खूपच अडीअडचणींचा सामना करावा लागतो. स्त्रियांचे आरोग्य बिघडण्याचे एक मुख्य कारण ही अडचण असल्याचे वैज्ञानिक संशोधनातून वारंवार सिद्ध झालेले आहे. स्त्रियाच नव्हे तर पुरुषांनाही मूत्रविकाराचे अनेक आजार बघायला मिळतात. मधुमेह असलेल्या व्यक्तीला वारंवार मूत्र विसर्जनाची गरज भासते. प्रोस्टेटचा आजार असलेल्या लोकांचीही अवस्था अतिशय बिकट होऊन जाते.

या सर्व परिस्थितीत शासनाची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची ही मोठी जबाबदारी आहे की आपल्या नागरिकांना त्रास होणार नाही व त्यांचे आरोग्य चांगले राहील यासाठी शहर आणि परिसरात जागोजागी स्त्रिया आणि पुरुषांसाठी वेगवेगळी स्वच्छतागृहे, वॉशरूम यांची व्यवस्था केली पाहिजे. या ठिकाणी हा मुद्दा आठवण्याचे कारण असे की, गेल्या काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायत असलेले निफाड गाव हे आता नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने निफाड नगर झाले आहे. निफाड नगरीचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून कधीकाळी फक्त बस स्टॅन्ड आणि तहसील कचेरीच्या परिसरात मर्यादित असलेली बाजारपेठ आणि नागरी वस्ती आता दोन-दोन किलोमीटर दूरपर्यंत पसरून गेली आहे.

निफाड शहराला ऐसपैस रस्त्यांचे वरदान लाभले आहे. चांदवडच्या दिशेने जाणारा उगाव रस्ता, सुरत शिर्डी हायवे, नाशिक-औरंगाबाद महामार्ग हे सर्व रस्ते निफाडच्या भूषणात भर घालणारे असेच आहेत. मात्र या ठिकाणी एक कमतरता अशी जाणवते की, निफाडच्या बसस्थानकाचा आणि जुन्या तहसील कचेरीचा परिसर सोडला तर कोठेही नागरिकांना मूत्रविसर्जनाची व्यवस्था केलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यांची कामे देताना ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उपलब्ध होतील याची काळजी घेते. नगरपंचायतही नागरिकांच्या सोयी सुविधांची काळजी घेते. मात्र या मूलभूत सुविधेकडेच सर्वांचे दुर्लक्ष का झाले आहे, हे लक्षात येत नाही.

निफाड बस स्थानकापासून उगाव रोडच्या बेघर वस्तीपर्यंत दोन किलोमीटरच्या अंतरात सर्वत्र दुकाने आणि बंगले झाल्यामुळे नागरिकांना मूत्रविसर्जनासाठी कोठे आडबाजूला जाण्याची सोय नाही. तीच परिस्थिती स्टेट बँक चौफुलीपासून नवीन तहसील कार्यालयापर्यंत, कुंदेवाडी रोडपर्यंत आणि आचोळा नाल्यापर्यंत शहराच्या चारही दिशांना झालेली दिसून येते आहे. इतकेच नव्हे तर अंत्यविधीसाठी जाणाऱ्या लोकांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. हा विषय कितीही गंभीर आणि गरजेचा असला तरी घृणा वाटेल, असा असल्यामुळे कोणीही त्यावर जाहीरपणे चर्चा करीत नाही, ही मोठी दुःखाची गोष्ट आहे.

हेही वाचा :

Back to top button