देशातील ४३०० आमदार एका मंचावर येणार एकत्र, एमआयटीतर्फे संमेलन | पुढारी

देशातील ४३०० आमदार एका मंचावर येणार एकत्र, एमआयटीतर्फे संमेलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील ४३०० आमदार राष्ट्रीय विधायक संमेेलनामध्ये एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर विचार विनिमय करणार आहेत. भारतातील सर्व विधानसभा व विधानपरिषदेचे अध्यक्ष व सभापती यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहेत. अशी माहिती रावेरचे आमदार शिरीष चौधरी, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे व भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटतर्फे आयोजित ‘राष्ट्रीय विधायक संमेेलन, भारत’ हे मुंबई येथील बीकेसी जीओ सेंटर मध्ये १५ जून ते १७ जून या दरम्यान होत आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदारांनी ही माहिती दिली. या वेळी एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद जळगावचे अध्यक्ष अजय पाटील, एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद जळगावचे समन्वयक अभिजीत भांडारकर, रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे जिल्हा समन्वयक योगेश ब्रिजलाल पाटील आणि एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे सह समन्वयक प्रकाश महाले उपस्थित होते.

गोलमेज परिषद होणार….

राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सर्वांगीण शाश्वत विकास या मध्यवर्ती विचार त्रिसुत्रीचा प्रमुख उद्देश ठेऊन आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचा उद्घाटन सोहळा १६ जून रोजी होणार आहे. १७ जून रोजी या संमेलनाचा समारोप होईल. या व्यतिरिक्त ४० समांतर सत्र आणि गोलमेज परिषद होणार आहे.

यांची राहणार उपस्थिती…
भारताच्या लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील चाकुरकर, मनोहर जोशी तसेच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे या संमेलनाचे मार्गदर्शक व संयोजक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल कराड यांच्या विचार चिंतनामधून ‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ ही संकल्पना साकारली आहे. ते या संमेलनाचे प्रमुख संयोजक समन्वयक आहेत.

हेही वाचा :

Back to top button