जळगावात महिलेने दिला तीन मुलींना जन्म; दोन मुलींना एकच हृदय; एक शरीर | पुढारी

जळगावात महिलेने दिला तीन मुलींना जन्म; दोन मुलींना एकच हृदय; एक शरीर

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : निसर्गात सतत काहीना काही चमत्कार घडत असतात. हे चमत्कार पाहून आपल्याला तोंडात बोटे घालण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. आता याला तुम्ही निसर्गाचा चमत्कार म्हणा किंवा आणखी काही, परंतु जळगावात एका महिलेने एकाच वेळी एक नव्हे, दोन नव्हे तब्बल तीन मुलींना जन्म दिला आहे. त्यातील दोन मुलींना एक हृदय, एक शरीर आहे. तिसरी मुलगी ठणठणीत आहे. पण या दोन मुलींच्या आयुष्याचा श्वास एकाच हृदयावर असल्याने या दोघींना जगवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

जळगावचे माहेर असलेल्या विवाहितेने गर्भधारणा झाल्यानंतर तपासणी केली. तेव्हा तिला तीन बाळ असल्याचे दिसून आले. त्यातील दोघींना एकच धड असून मानेपासून दोघांचे डोके वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले. तिसरा गर्भ सुरक्षित असल्याने गर्भपात करणे शक्य नव्हते. त्यामुळे या दाम्पत्याने बाळंतपणासाठी तयारी दाखविली. पालकांच्या समंतीनंतर डॉ. नवाल यांनी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. नवजात लेकींपैकी जुळलेल्या जुळ्यांचे बालरोग तज्ज्ञ डॉ. वैभव महाजन यांच्याकडे उपचार सुरू करण्यात आले. नवजात जुळ्या मुलींना मानेवरचा भाग स्वतंत्र आहे. मात्र, दोघींना जगण्यासाठी शरीर, हात आणि पाय एकत्रित आहेत. त्यामुळे दोघींना दोन हातांनी आणि पायांनी एकमेकींच्या साथीने जगावे लागणार आहे. यापुढेही हे सयामी जुळे आयुष्यभर असेच राहू शकतात, असे मत बालरोग तज्ज्ञ डॉ वैभव महाजन यांनी व्यक्त केले.

26 बोटांच्या बाळाचा जन्म

तीन दिवसांपूर्वी अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात समोर आली होती. एका महिलेने 26 बोटे असलेले बाळाला जन्म दिल्याची घटना घडली होती. सर्वाधिक बोटे असलेले देशातील हे पहिलंच मूल असावे असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. 26 बोटांचे मूल पाहून वैद्यकीय क्षेत्रासमोरही मोठे आव्हान उभे राहिले होते. हात किंवा पायाला एक-दोन बोटे अधिक असल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. मात्र चक्क 26 बोटे असलेले बाळ यावल तालुक्याच्या न्हावी गावात जन्माला आले. वैद्यकीय इतिहासातील ही दुर्मिळ घटना मानली गेली. नवजात बाळाच्या दोन्ही हाताला एक-एक तर दोन्ही पायाला दोन-दोन अधिकची बोटे आहेत. या बाळावर सहा महिने ते एक वर्षापर्यंत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर आता जळगाव शहरात तीन मुलींचा जन्म झाला आहे.

Back to top button