राज ठाकरे नाशिकमध्ये, आज घेणार पक्षांतर्गत आढावा | पुढारी

राज ठाकरे नाशिकमध्ये, आज घेणार पक्षांतर्गत आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तब्बल वीस महिन्यांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. इगतपुरी तसेच शहरात ठाकरे यांचे मनसे सैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. शनिवारी (दि.२०) शासकीय विश्रामगृह येथे ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवसभर बैठकांचे सत्र सुरू राहणार असून, त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला जाणार आहे. त्यात नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव व छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांतील संघटनेच्या कामकाजाची माहिती घेऊन निवडणुकीची रणनीती ठरविली जाणार आहे.

मनसेप्रमुख तीन नाशिकमध्ये तळ ठोकून राहणार असून, पहिल्या दिवशी अर्थात शनिवारी (दि.२०) ते विभागीय अध्यक्ष व शाखाध्यक्षांबरोबर वन टू वन संवाद साधणार आहेत. शासकीय विश्रामगृहावर सकाळी आठपासून शाखाध्यक्षांसोबत ते चर्चा करणार आहेत. पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी साडेआठ ते नऊ, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी नऊ ते साडेनऊ, तर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी साडेनऊ ते दहा या वेळात बैठक होईल. सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद होईल. त्यानंतर विभागीय अध्यक्षांसोबत बैठक होणार आहे.

दुपारीच्या महिला सेनेसह शहर पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल. शहर रुग्णवाहिकेच्या लोकार्पणानंतर सायंकाळी ठाकरे हे निमा पॉवर प्रदर्शनाला भेट देणार आहेत. रविवारी (दि.२१) सकाळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा होणार आहे. सकाळी दहा ते साडेदहा कालावधीत क्रेडाई मेट्रो, तर साडेदहा ते अकरा या कालावधीमध्ये वास्तुविशारद संघटना पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार आहेत. त्यानंतर ग्रामीण पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

शहराध्यक्षांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार ?

आगामी महापालिका निवडणुकीची तयारी करताना संघटनात्मक बांधणीवरदेखील लक्ष केंद्रित करण्याचे संकेत राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात नाशिक मनसेत मोठ्या प्रमाणात खांदेपालट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर नवीन शहराध्यक्ष राज ठाकरे नेमणार का? याकडे ही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Back to top button