दै. पुढारी इम्पॅक्ट : जिल्हा आरोग्य अधिकारी धारेवर; कळमुस्ते आरोग्य पथकाच्या चौकशीचे आदेश | पुढारी

दै. पुढारी इम्पॅक्ट : जिल्हा आरोग्य अधिकारी धारेवर; कळमुस्ते आरोग्य पथकाच्या चौकशीचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते आरोग्य पथक केंद्रामध्ये अस्वच्छता, फुटलेल्या दारूच्या, औषधांच्या बाटल्यांचा खच तसेच इतर अनियमिततेबाबत दै. ‘पुढारी’मध्ये मंगळवारी (दि. 16) ‘कळमुस्ते आरोग्य केंद्रच रुग्णशय्येवर’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध होताच जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) समितीच्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यांतर्गत येणार्‍या कळमुस्ते प्राथमिक आरोग्य पथकाच्या इमारतीच्या अवस्थेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) समितीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहेत. तसेच जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांना जागेवर जाऊन पाहणी करत सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. दिशा संनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या आरोग्य विषयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्याच्या योजनांबाबत असलेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. 16) झाली. यात जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरकर, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, समितीचे अशासकीय सदस्य राहुल केदारे, हितेंद्र पगारे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेबाबत नाराजीचा सूर लोकप्रतिनिधींमध्ये होता. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचा मुद्दादेखील मोठ्या प्रमाणावर गाजला. निधी असूनही कोणतेही कामे वेळेवर का होत नाही, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना सुनावत आरोग्य यंत्रणेची चौकशी करत तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) समितीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सूचना दिल्या आहेत. त्या ठिकाणी तत्काळ जाऊन पाहणी करत सुधारणा करण्याबाबतचा अहवाल तयार करून देण्यात येणार आहे. संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र, पथक यांचे वैद्यकीय अधिकारी यांचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे. – डॉ. हर्षल नेहेते, जिल्हा आरोग्य अधिकारी.

 

दै. पुढारी मध्ये मंगळवारी (दि.16) प्रसिद्ध झालेली बातमी.

Back to top button