नाशिक : दांडीबहाद्दरांना रोखण्यासाठी मनपाची अशीही शक्कल, उपप्रवेशद्वारांना लॉक लावून… | पुढारी

नाशिक : दांडीबहाद्दरांना रोखण्यासाठी मनपाची अशीही शक्कल, उपप्रवेशद्वारांना लॉक लावून...

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला रवाना होताच मुख्यालयातील अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचा बेशिस्त कारभार चव्हाट्यावर आला होता. अशात प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकारी – कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करताना कामाच्या वेळा पाळण्याचे आदेश देताना ई-मूव्हमेंट प्रणाली तत्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच कर्मचारी – अधिकाऱ्यांना मुख्य प्रवेशद्वारातूनच ‘एंट्री अन् एक्झिट’ बंधनकारक करण्यात आली असून, मुख्यालयाच्या इतर प्रवेशद्वारांना लॉक लावले जात असल्याने, दांडीबहाद्दरांचा चांगलाच बंदोबस्त केल्याची चर्चा यानिमित्ताने मुख्यालयात रंगत आहे.

अधिकारी – कर्मचारी मुख्यालयात कमी अन् बाहेर जास्त असे चित्र दिसून येत असल्याने, प्रभारी आयुक्त गमे यांनी मुख्यालयात अचानक एंट्री करीत अधिकारी – कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा ‘आँखो देखा’ अनुभवला होता. वरिष्ठ अधिकारी कामाच्या वेळेत हजर नसल्याचे समोर आल्यानंतर आयुक्त गमे यांनी संबंधितांची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्याचबरोबर असा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही खडेबोल सुनावले होते. यावेळी एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने आयुक्त गमे यांची दिशाभूल करताना मुख्यालयात वेळेत पोहोचल्याची थाप मारली होती. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही अधिकारी 11.30 च्या सुमारास मुख्यालयात आल्याचे समोर आले होते. आयुक्त गमे यांनी ही बाब अत्यंत गंभीरपणे घेत, अधिकाऱ्यांनी कामाच्या वेळेतच मुख्यालयात पोहोचणे गरजेचे असल्याचे सुनावले होते.

त्याचबरोबर अधिकारी – कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळा पाळाव्यात म्हणून ई-मूव्हमेंट प्रणाली तत्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने, याच प्रवेशद्वारातून कर्मचारी – अधिकाऱ्यांनी एंट्री अन् एक्झिट करावी, असे बंधनकारक केले आहे. तसेच मुख्यालयाच्या इतर सर्व उपप्रवेशद्वारांना लॉक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. अचानक अशा प्रकारचे बदल करण्यात आल्याने, याची सध्या मुख्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे. शिवाय दांडीबहाद्दरांना चाप बसला आहे.

हेही वाचा :

Back to top button