नाशिक : इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटीला वाढते पाठबळ

नाशिक : इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटीला वाढते पाठबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एनईएसएल) इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी कार्यप्रणालीमुळे बँक गॅरंटी उपलब्ध करणे, विनंती करणे, त्यात सुधारणा करणे किंवा रद्दबातल करणे, सुलभ करणे शिवाय कोणताही दस्ताऐवज विनंतीवर छापणे अतिशय सुलभ झाले आहे. ही पद्धत अतिशय सोपी, सुरक्षित, सुलभ असून व्यावसायिक दैनंदिन व्यवहारात उपयुक्त ठरली आहे. उद्योजक, मालक, पार्टनरशिप फर्म, सरकार, एजन्सी, सामान्य व्यक्ती या सगळ्या समाजघटकांना या सुविधेचा लाभ होत आहे. सध्या ही सुविधा ई-स्टँपिंग उपलब्ध असलेल्या राज्यात लागू केली गेलेली आहे.

भारतात सध्या 12 बँकांमार्फत ही सुविधा दिली जाते. फेडरल बँकेनेही इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एनईएसएलसोबत नुकतीच भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे बँकेच्या ग्राहकांना डिजिटल अनुभव मिळण्यास मदत होणार आहे. या नवीन डिजिटल कार्यप्रणालीने पारंपरिक क्लिष्ट कागदपत्रांच्या प्रक्रियेची जागा घेतल्याने वेळेत आणि खर्चात बचत झाली आहे. पूर्वी बँक गॅरंटीसाठी लागणारा तीन-चार दिवसांचा कालावधी हा ई-बीजीमुळे अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपला आहे. पेपरलेस ई-स्टॅम्पिंग, ई-स्वाक्षरी करणे, एनईएसएल पोर्टलवर अंतिम इलेक्ट्रॉनिक बीजीची माहिती झळकणे आणि लाभार्थ्यांना अंतिम बीजीची सूचना मिळणे हे सर्व डिजिटल स्वरूपात होते. केंद्र सरकारच्या ई-गव्हर्नन्स योजनेमुळे डिजिटल व्यवहारांना गती मिळाली आहे. ई-बीजी अंतर्गत नोव्हेंबर 2022 अखेर तब्बल 10 लाख कागदपत्रे ही डिजिटल डॉक्युमेंटेशन स्वरूपात पूर्ण केली गेल्याने उद्योजकांना तसेच स्वयंरोजगारनिर्मिती करू इच्छिणार्‍यांना अवघ्या सहा मिनिटांत कागदपत्रांची पूर्तता करता येत आहे. एनईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देबज्योती रे म्हणाले की, सध्याच्या अत्याधुनिक युगात बँक गॅरंटी लाभार्थ्यांना कुरियरद्वारे किंवा प्रत्यक्ष डिलिव्हरी घेण्याची वाट पाहावी लागणार नाही. तसेच पडताळणीची किचकट प्रक्रियाही टाळता येईल. एनईएसएल ई-बीजीच्या माध्यमातून ही सेवा तत्पर मिळेल. लाभार्थ्यांना सरळ सोप्या रजिस्ट्रेशन प्रकियेत पूर्ण ह़ोणारी कार्यप्रणाली उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटीच्या दुरुस्त्या किंवा त्या रद्द करणे हे संपूर्णपणे डिजिटल पद्धतीने केले जाते. फेडरल बँकेच्या अधिकारी शालिनी वॉरियार म्हणाल्या की, बँकेने ई-बँक गॅरंटी सुविधेला पाठबळ दिले आहे. अत्यंत वेगवान पद्धतीने ई-बीजीचा लाभ बँक ग्राहकांना होणार आहे. सुरक्षित पारदर्शक व्यवहारामुळे कोणत्याही प्रकारचा घोटाळा होण्याची शक्यता निकाली निघाली आहे. त्यामुळे स्टँप ड्यूटीची योग्य आकारणी आणि प्रक्रियेवरील खर्च वाचण्यास मदत होईल.

ई-बीजीचे फायदेइ असे…
* ग्राहकांच्या खर्चात, वेळेत बचत.
* वेगवान प्रक्रिया.
* आयटी कायदा 2000 चे पाठबळ.
* एनईएसएलकडे आर्थिक माहिती संकलित.
* डिजिटल डॉक्युमेंट एक्झ्युकेशनचे पाठबळ.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news