पिंपळनेर (नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयावरून त्रास देणारा पतीचा पत्नीनेच चाकूने सपासप वार करून खून केला. ही घटना कुडाशी ( ता.साक्री ) येथे घडली. पत्नीने खून केल्यानंतर पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात संबंधित महिलेविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणावळा (जि. पुणे) येथील मुळ रहिवासी व सध्या साक्री तालुक्यातील कुडाशी गावात वास्तव्यास असलेले नरेश रामू कुमार (वय ३५ ) हा रोज दारू पिऊन पत्नी सुरेखा व मुलांना त्रास देत होता. पत्नी सुरेखा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत होता.
नियमित होणाऱ्या या छळास कंटाळून सुरेखाने दि.१६ रोजी पहाटे दारूच्या नशेत झोपलेल्या पती नरेश याच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. पती नरेश याचा जागीच मृत्यू झाला. खून केल्याचा कुणाला संशय येऊ नये म्हणून तिने पतीच्या हातात चाकू ठेवला. स्वतःचे रक्ताने भरलेले हात पाण्याने धुऊन पुरावा नष्ट केला.
या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना सुरेखा हिची वर्तणूक संशयास्पद वाटली. महिला पाेलिसांनी सखाोल चाैकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात सुरेखा विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक मालचे करीत आहेत.