धुळे शहरातील रस्ते विकासासाठी राज्य सरकारकडून 60 कोटींचा निधी मंजूर | पुढारी

धुळे शहरातील रस्ते विकासासाठी राज्य सरकारकडून 60 कोटींचा निधी मंजूर

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे महानगरपालिकेच्या रस्ते विकास प्रकल्पास राज्यातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना युती सरकारने अंतिम मंजुरी देत 60 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून धुळे शहरातील अनेक प्रलंबित रस्त्यांची विकास कामे मार्गी लागणार आहेत.

धुळे शहराच्या विविध प्रभागांमधील रस्ते विकास कामांच्या प्रकल्पांना निधी मिळावा, यासाठी भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी खा. डॉ.सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत निधी मंजुरी करण्याची विनंती करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र देवून मागणी केली. त्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत धुळे महानगरपालिकेचा रस्ते विकास प्रकल्प नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत राज्यस्तरीय मान्यता समितीकडे मान्यतेकरीता सादर करण्यात आला. या प्रकल्पास मुख्य अभियंता, सार्वजनिक काम विभाग, नाशिक विभाग यांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने दिनांक 11 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीमध्ये केलेल्या शिफारसीनुसार या प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यात धुळे शहरासह देवपूर आणि विविध प्रभागातील 41 विकास कामांसाठी 58.79 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याचे पत्र मनपा आयुक्तांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राप्त झाले आहे. राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने धुळे शहराच्या विकासासाठी मंजूर केलेला हा भरघोस निधी शहरातील रस्ते विकासासाठी महत्वाचा ठरणार असून देवपूरसह शहरातील अनेक भागातील रस्त्यांची कामे यामुळे पूर्ण होणार असल्याचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल व खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे आभार व्यक्त केले आहे. तसेच माजी स्थायी समिती सभापती शितलकुमार नवले यांनी त्यांच्या कार्यकाळात महापालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे रस्ते विकास प्रकल्प सादर करुन त्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल शितलकुमार नवले यांचे कौतुक केले आहे. तसेच केवळ धर्माच्या नावाने नव्हे तर विकासाच्या माध्यमातून धुळे शहरात बदल घडवण्याचे  ध्येय यातून साध्य होणार असल्याचे अनुप अग्रवाल यांनी म्हटले आहे. संपूर्ण धुळे शहरातील विकास कामांसाठी निधी मंजूर झाल्याने देवपूर, मिलपरिसर, चितोड, महिंदळे, अवधान, गोंदूर अशा सर्वच भागातील प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. लवकरच ही कामे सुरु होऊन नागरीकांना मोठा लाभ मिळणार आहे. अनेक ठिकाणच्या समस्या त्यामुळे सुटणार असल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा:

Back to top button