नाशिक : फरार कोयत्या अखेर गजाआड | पुढारी

नाशिक : फरार कोयत्या अखेर गजाआड

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, मारहाण असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व गेल्या काही महिन्यांपासून मागावर असलेल्या पोलिसांना वारंवार गुंगारा देणार्‍या विकी ऊर्फ काळ्या कोयत्या बाळू जाधव (28) याला अखेर पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने ओझर ग्रामीण भागात बेड्या ठोकल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी काळ्या कोयत्या गंगाघाट परिसरात दरोडा टाकण्याच्या इराद्याने रामसेतू पुलाजवळ दबा धरून बसलेला होता. त्यावेळी पंचवटी पोलिसांनी त्याच्या इतर साथीदारांना बेड्या ठोकल्या होत्या. मात्र, कोयत्या फरार झाला होता. अखेर त्याला पकडण्यात पंचवटी पोलिसांना यश आले आहे. सराईत गुन्हेगार असलेला काळ्या कोयत्या हातात धारदार कोयता घेऊन परिसरात दहशत निर्माण करत होता तर त्याला विरोध करणार्‍यांवर थेट शस्त्राने हल्ला करत असे. अशा कोयत्याबाबत पंचवटी तसेच इतर पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल आहेत. पेठ रोड भागात राहत असलेल्या कोयत्याच्या शोधार्थ पंचवटी पोलिसांनी अनेकदा सापळा रचला. मात्र, तो पोलिस आल्याची भनक लागताच फरार होत असे. सराईत गुन्हेगार काळ्या कोयत्या हा ग्रामीण भागातील एका गावात लपून बसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळताच गुन्हा शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार यांच्यासह सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक काकड, राकेश शिंदे, अविनाश थेटे, अंकुश काळे, नारायण गवळी आदींनी सोमवारी दुपारी ग्रामीण भागात सापळा रचून काळ्या कोयत्याला बेड्या ठोकल्या. सराईत गुन्हेगार कोयत्या पंचवटी पोलिस ठाण्यातील तीन तसेच सरकारवाडा पोलिस ठाण्यातील एक अशा चार गंभीर गुन्ह्यांत फरार होता.

हेही वाचा:

Back to top button