धुळे : बनावट मद्यनिर्मिती केंद्रावर छापा; तिघांच्या आवळल्या मुसक्या | पुढारी

धुळे : बनावट मद्यनिर्मिती केंद्रावर छापा; तिघांच्या आवळल्या मुसक्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा

बनावट दारू तयार करण्याचे केंद्र तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने उध्वस्त केले आहे. या प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे तालुक्यातील मोराणे शिवारात बनावट दारू तयार करणे सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार श्री संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहाच्या समोर असणाऱ्या एका बंद घरावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी या घरांमध्ये बनावट आणि विषारी दारू तयार करण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती पुढे आली. घटनास्थळावरून पोलिसांनी 60 हजार 480 रुपये किमतीच्या 180 मिली क्षमतेच्या 336 दारूच्या बाटल्या जप्त केल्या.

या बाटल्यांमध्ये बनावट मद्य भरून त्यावर बनावट स्टिकर आणि बुच लावण्यात आल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झाली आहे. त्याच प्रमाणे चार हजार तीनशे वीस रुपये किमतीचा आणखी रॉयल चॅलेंज कंपनीचे बनावट मद्य देखील तयार केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावरून जी जी 16 ए एन १४०९ क्रमांकाचे एक स्कुटी जप्त करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी मलिंदरसिंग गुरुमुखसिंग शिकलकर, रमेश गोविंदा गायकवाड, बिल्लू भिवराज साळवे अशा तिघां विरोधात गुन्हा दाखल केला असून या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button