नाशिक : आता बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विक्रीला बसणार लगाम | पुढारी

नाशिक : आता बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विक्रीला बसणार लगाम

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
खरीप हंगामात बोगस बियाणे, खते व कीटकनाशकांची विक्री होऊ नये याकरिता हंगाम सुरू होण्यापूर्वी कृषी विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथके व तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली आहे. यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक व बोगस विक्री होणारे बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसण्यास आहे. याकरिता शेतकर्‍यांनी कृषी विभागाच्या 18002334000 या टोल फ्री नंबरवर संपर्क करून तक्रार करता येईल, अशी माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी नंदकुमार अहिरे यांनी दिली.

खरीप हंगामात शेतकरी बांधवांना वेळेवर दर्जेदार व गुणवत्तापूर्वक कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात म्हणून कृषी विभागाने हंगामापूर्वीच नियोजन केले आहे. त्याअनुषंगाने तालुक्यातील बियाणे, खते व कीटकनाशके परवानाधारकांची नुकतीच एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. सदर प्रशिक्षण वर्गास उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी महेश वेठेकर, पंचायत समिती कृषी अधिकारी अहिरे यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवांना कृषी निविष्ठांची विक्री करताना विक्रेत्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत पंचायत समिती कृषी अधिकारी अहिरे यांनी मार्गदर्शन केले. कृषी निविष्ठा जादा दराने विक्री न करणे, लिंकिंग न करणे, विक्री केंद्रात खते शिल्लक असूनही खते न देणे, विक्री परवाना व भावफलक सहज दिसेल अशा दर्शनी भागात लावणे, खतांची विक्री ई-पॉस पद्धतीने करणे, शेतकरी बांधवांना खरेदीचे बिले देणे याबाबत प्रशिक्षणात माहिती देण्यात आली. नर्सरीधारकांनी परवाना घेतल्याशिवाय भाजीपाला रोपांची खरेदी-विक्री करू नये, असे आवाहनही केेले. सिन्नर तालुका अ‍ॅग्रो डिलर्सचे अध्यक्ष दीपक सानप, उपाध्यक्ष गुरुनाथ पवार यांनी खरीप हंगामात शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही व कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने विक्रेत्यांना करण्यात आले.

अपघात विमा योजनेचा विक्रेत्यांनी प्रचार करावा
शेतकरी बांधवांचा वीज पडून, संर्पदंशाने, रस्ता अपघात, कीटकनाशके फवारताना विषबाधा होणे, इतर नैसर्गिक कारणाने कायमस्वरूपी अपंगत्व किंवा मृत्यू होतो. यावेळी त्यांच्या कुटुंबातील वारसांना कै. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ घेण्याबाबत विक्रेत्यांनी प्रचार करावा. तसे परिपत्रक विक्री केंद्रात लावावे अशा सूचना उपविभागीय कृषी अधिकारी सूर्यवंशी यांनी दिल्या.

तक्रार निवारण अधिकारी : ऐन हंगामात रासायनिक खते वितरणात सुसूत्रता राहण्यासाठी, कृषी निविष्ठा उपलब्धता व गुणवत्तेबाबतच्या तक्रारींचे नियोजन करण्यासाठी तसेच खतांच्या तुटवड्याच्या काळात विक्री केंद्रात खते उपलब्ध असूनही शेतकर्‍यांना न देणे अशा तक्रारी येतात. त्यासाठी कृषी अधिकारी दिलीप डेंगळे-9822611251, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (कृषी) दीपाली मोकळ-9823451662, तंत्र सहायक एन. एस. रंधे- 9422990271, कृषी सहायक राम आदमे- 9422121781 या तालुकास्तरीय निवारण कक्षातील अधिकार्‍यांशी संपर्क करून शेतकरी बांधव तक्रार नोंदवू शकणार आहेत.

बोगस बियाणे विक्री आढळल्यास गुन्हे दाखल होणार
तसेच खरीप हंगामाच्या तोंडावर परराज्यातील काही कंपन्या शेतकर्‍यांच्या बांधावर बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विक्री करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते. असे आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत शेतकर्‍यांपर्यंत बोगस बियाणे, खते व कीटकनाशके पोहोचणार किंवा विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी असे तालुका कृषी अधिकारी वेठेकर यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button