नाशिक : घोटी येथील बड्या राइस मिलवर छापा; तिघांविरोधात गुन्हा दाखल

घोटी : पोलीस ठाण्यात जप्त केलेला रेशनच्या तांदळाने भरलेला टेम्पो.
घोटी : पोलीस ठाण्यात जप्त केलेला रेशनच्या तांदळाने भरलेला टेम्पो.

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
राज्यभरात तांदळासाठी प्रसिध्द असलेल्या घोटी येथील सर्वात मोठ्या व्यापार्‍याच्या राईस मिलवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून 12 लाख रुपये किंमतीचा चॉकलेटी रंगाचा टाटा कंपनीचा टेम्पो व 4 लाख 29 हजार 260 रुपये किमतीचा रेशनचा तांदूळ असा एकूण 16 लाख 29 हजार 260 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने इगतपुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, घोटीतील इतर राइस मिलकडेही संशयाने पाहिले जाऊ लागले आहे.

घोटी शहरातील सर्वांत मोठे व्यापारी मे. भाकचंद केशरमल पिचा यांच्या राइस मिलमध्ये रेशनचा तांदूळ काळ्या बाजारातून या मिलवर येणार असल्याची खबर पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांना मिळाली होती. उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे पथकाने छापा टाकला असता टेम्पोत लाखो रुपयांचा रेशनचा तांदूळ आढळून आला. संबंधित मिल मालक तुषार नवसुखलाल पिचा, टेम्पोचालक विलास फकिरा चौधरी (29, रा. खंबाळे, ता. इगतपुरी), विक्रेता चेतन ट्रेडिंग कंपनीचे मालक तथा ब्रोकर महेंद्र सिंघवी (रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम यांच्या पथकाने या छाप्यात 4 लाख 29 हजार 260 रुपये किमतीचा 16 हजार 900 किलो वजनाचा तांदूळ जप्त केला. हवालदार गिरीश दिनकर निकुंभ यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. 4) सहायक पोलिस निरीक्षक निकम, हवालदार बापूराव पारखे, रवींद्र टर्ले, भूषण मोरे, मधुकर गायकवाड यांच्या पथकाने कारवाई केली. चॉकलेटी रंगाच्या टाटा कंपनीच्या टेम्पोवर (एमएच 15 एफव्ही 9094) छापा घालून चालकास ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवला. चालक विलास चौधरी याने टेम्पोमधील मालाबाबत माहिती दिली. हा तांदूळ केडगाव येथील चेतन ट्रेडिंग कंपनीचे मालक व ब्रोकर महेंद्र सिंघवी यांचा असल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम पुढील तपास करीत आहेत.

पुणे जिल्ह्याचे कनेक्शन
अवैध धंंद्यांवर घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करीत असताना पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीबाबत त्यांनी केडगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथून रेशन दुकानातून जमा केलेला जुना तांदूळ एफसीआयचे गोण्यांमधून काढून, गोण्या नष्ट करून हा रेशनचा जुना तांदूळ वेगवेगळ्या कंपन्यांच्या गोण्यांमध्ये भरून तो घोटी गावात खुल्या बाजारात विक्रीकरिता येत आहे, अशी खबर मिळाली होती.

पावतीत एक, टेम्पोत वेगळाच माल
पावतीमध्ये साईल, 171 नग, 10,070 किलो वजन व 2540 रुपये दर असा एकूण 2,55,778 रुपये किंमत असलेली चेतन ट्रेडर्स कंपनी, किराणा भुसार मालाचे व्यापारी, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे अशी पावती सादर केली. मात्र, बिलाप्रमाणे ही गाडी चेक केली असता या टेम्पोमध्ये जुना रेशनचा तांदूळ माल दिसून आल्याने त्यांनी पुरवठा विभागातील निरीक्षक पी. डी. गोसावी, पुरवठा निरीक्षक अधिकारी बी. आर. डोणे यांच्या समक्ष टेम्पोची तपासणी केली. टेम्पोमध्ये प्रत्यक्षात 4 लाख 29 हजार रुपये
किमतीच्या रेशनच्या जुन्या तांदळाचे सफेद, पोपटी, लाल, आकाशी, नारंगी अशा वेगवेगळ्या रंगांच्या एकूण 290 गोण्या मिळून आल्या.

अनेकदा छापे; पण ठोस कारवाई नाहीच
इगतपुरी तालुक्यात यापूर्वी अशाच प्रकारच्या कारवाया झाल्या असून, तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडून रेशनच्या तांदळाचा सॅम्पल लॅबला पाठवला जातो. मात्र त्याचे रिपोर्ट राइस मिल किंवा व्यापार्‍यांच्या बाजूनेच येतात, असा यापूर्वीचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गोरगरिबांच्या तोंडचा घास ओढून गब्बर होणार्‍या रेशनमाफियांकडे जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्तजातीने लक्ष घालून कठोर कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news