नाशिक : श्वान निर्बिजीकरणाचा ठेका कोटीच्या घरात, महापालिका मोजणार इतके पैसे | पुढारी

नाशिक : श्वान निर्बिजीकरणाचा ठेका कोटीच्या घरात, महापालिका मोजणार इतके पैसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

श्वान निर्बिजीकरण ठेक्याला महासभेने मंजुरी दिली असून त्यासाठी ठेकेदाराला तीन वर्षांसाठी ९९ लाख ९९ हजार ९६० रुपये मोजले जाणार आहेत. जुना श्वान निर्बिजीकरणाचा ठेका मागील महिन्यात संपुष्टात आला. दरम्यान, मनपा प्रशासन श्वान निर्बिजीकरणावर लाखो रुपये खर्च करत असली तरी मोकाट श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. श्वान निर्बिजीकरणाच्या नावाखाली ठेकेदारांच चांगभलं होत असल्याचे चित्र आहे.

शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना मोकाट श्वानांची संख्याही वेगाने वाढत असून गल्लीबोळात सुळसुळाट पहायला मिळत आहे. नाशिकरोड, पंचवटी, सिडको, सातपूर, पश्चिम व नाशिक पूर्व या सहाही विभागांतील विविध भागांत मोकाट श्वानांचे टोळके पहायला मिळतात. मोकाट श्वानांची संख्या नियंत्रणात असायला हवी, यासाठी महापालिका निर्बिजीकरण करुन श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण मनपा श्वान निर्बिजीकरणाची कितीही दावे करत असली तरी श्वानांची संख्या वाढत आहे. शहर परिसरात वयोवृद्ध ते लहानग्यांवर मोकाट श्वानांकडून हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. दरम्यान गतवर्षी श्वान निर्बिजीकरण ठेका संपुष्टात आल्याने मनपाने निविदा प्रक्रिया राबवली. मात्र कोणीही संस्था पुढे न आल्याने मनपाने एका वर्षासाठी श्वान निर्बिजीकरणचा ठेका शरण संस्थेला दिला होता. मागील महिन्यात शरण या संस्थेला दिलेल्या ठेक्याची मदत संपुष्टात आली. आता हा ठेका जॅनिश स्मित अॅनिमल या संस्थेला देण्यास महासभेने मंजुरी दिली. त्यासाठी ९९ लाख ९९ हजार ९६० रुपये इतके पैसे महापालिका मोजणार आहे.

विल्होळी येथे निर्बिजीकरण केंद्र

नागरिकांनी केलेल्या तक्रारीची पालिकेकडून तक्रारीची तात्काळ दखल घेउन ज्या परिसरात श्वान आहे, तेथून पकडून विल्होळी येथील केंद्रावर नेले जाते. केंद्रावर श्वानांचे निर्बिजीकरण झाल्यानंतर तीन दिवस निगराणीत ठेवल्यानंतर पुन्हा त्यांच्या परिसरात सोडले जाते. शहरात दिवसाला तीस ते चाळीस श्वान पकडले जातात. २०२२ ते २०२३ य‍ा वर्षांत नउ हजारहून अधिक श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button