Nashik : दीड महिन्यावर पावसाळा, आयुक्तांचा खड्ड्यांसाठी अल्टिमेटम | पुढारी

Nashik : दीड महिन्यावर पावसाळा, आयुक्तांचा खड्ड्यांसाठी अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात गॅसपाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून वर्दळ असलेले रस्ते फोडण्यात आले आहेत. पावसाळा दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. गेल्या वर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेचे वाभाडे निघाले होते. हा अनुभव पाहता यंदा ३१ मेपर्यंत शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविले गेले पाहिजेत, असा अल्टिमेटम आयुक्तांनी बांधकाम विभागाला दिला आहे.

शहरात गेल्या वर्षी 600 कोटी रुपये खर्चून नवीन रस्ते बांधण्यात आले हाेते. अनेक रस्त्यांची डागडुजी करून त्यांचे अस्तरीकरण करण्यात आले होते. भूसंपादनानंतर सर्वाधिक निधी रस्त्यांवर करण्यात आला होता. मात्र, पावसाने महापालिकेचे पितळ उघडे पाडले होते. मुख्य बाजारपेठेसह शहर व उपनगरांत रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले होते. नवीन रस्ते उखडल्याने बांधकाम विभाग व ठेकेदार यांची युती उघड झाली होती. त्यावेळी आयुक्तांनी बांधकाम विभाग व ठेकेदारांची खरडपट्टी केली होती. यंदादेखील नाशिककरांना हा मनस्ताप सहन करावा लागू शकतो. ते पाहता आयुक्तांनी बांधकाम विभागाची बैठक घेत मे अखेरपर्यंत सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची, अशी सूचना केली. तसेच गॅस पाइपसाठी खोदकाम करणार्‍या कंपनीला मे अखेरनंतर काम करायचे नाही, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

मे अखेरपर्यंत शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवले जाणार आहेत. तशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

– शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, बांधकाम विभाग

Back to top button