गुंतवणुकीचे लक्ष्य... ट्रॅक्टर खरेदीवर ठेवा लक्ष | पुढारी

गुंतवणुकीचे लक्ष्य... ट्रॅक्टर खरेदीवर ठेवा लक्ष

नाशिक : राजू पाटील

गुंतवणुकीच्या विश्वात

सध्याच्या काळात ‘गुंतवणूक’ या शब्दाला सोन्याइतकेच मोल आले आहे. परंतु गुंतवणूक ही काही साधीसुधी बाब नाही. आपली आर्थिक ताकद, जोखीम सहन करण्याची क्षमता, आपल्या आयुष्यातील उद्दिष्टे, कुटुंबासाठी भविष्यात लागणारी आर्थिक तरतूद आदी सार्‍या बाबींचा विचार करत दरमहा गुंतवणूक करणे सहज शक्य आहे. त्यासाठी आयुष्यात अगदी तरुणपणापासून शिस्त अवलंबिल्यास वयाच्या पन्नाशी पर्यंत एकगठ्ठा रक्कम संचयित करणे शक्य आहे. त्यासाठी काही धावाधाव, पळापळ करण्याची गरजही नाही.

गुंतवणुकीचा सोपा मार्ग म्हणजे ‘एसआयपी’ अर्थात नियमित गुंतवणूक योजना ही होय. एसआयपीबरोबरच आजच्या तरुणाईने शेअरबाजारात दरमहा किंवा दर दोन महिन्यांनी किमान हजार-दीड हजार रुपये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कारण एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीवर असलेल्या करसवलती सरकार दरवर्षी हळूहळू काढत चालले आहेत. यंदा सरकारने युलीप योजनांवरील करसवलत पूर्णत: हटवून टाकल्याने गुंतवणूकदारांची पंचाईत झाली आहे. तरी गुंतवणूकदारांना शेअरबाजारात अमाप संधी आहेत. आपण त्यासाठी ग्रामीण भागाकडे वळू या. ग्रामीण भागासाठी केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षांत अनेक योजना आणल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला वेग मिळाला आहे. ग्रामीण भागाच्या कर्जाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक वित्तसहाय्य कंपन्या कार्यरत आहेत. शेतीच्या यांत्रिकीकरणाला अर्थसहाय्य करणार्‍या कंपन्यांत महिंद्र, चोलामंडलम् , एल अ‍ॅण्ड टी फायनान्स, बजाज फायनान्स, श्रीराम अशा कितीतरी एनबीएफसी कंपन्या आहेत. गेल्या तीन वर्षांत ट्रॅक्टर खरेदीत जवळपास 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ट्रॅक्टर खरेदीला पुढील 10 वर्षांत येणार्‍या वेगाचा विचार केल्यास ट्रॅक्टर खरेदीसाठी वित्तपुरवठा करणार्‍या एनबीएफसी कंपन्यांची कामगिरी अतिशय बळकट अशी राहणार, हे उघड आहे.

एनबीएफसीत एल अ‍ॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्जची कामगिरी अतिशय चमकदार राहिली आहे. कंपनीचा एकत्रित करोत्तर नफा (पॅट) 2022-23 साठी 1,623 कोटी रुपये असून, त्यात 52 टक्के वाढ झाली आहे. निव्वळ चौथ्या तिमाहीसाठी करोत्तर नफा गत चौथ्या तिमाहीच्या तुलनेत 46 टक्क्यांनी वाढून 501 कोटी रुपयांवर गेला आहे. अशी कामगिरी फारच थोड्या एनबीएफसी कंपन्यांना करता आलेली आहे. कंपनीने वर्षभरात ग्रामीण भागात 16,910 कोटी रुपयांचे कर्जवितरण केले आहे. देशात ट्रॅक्टरसाठी वित्तसहाय्य क्षेत्रातील बाजारपेठेत ही कंपनी अव्वलस्थानी आलेली आहे. 2023 च्या वित्तीय वर्षात शेतकर्‍यांना 6,450 कोटींचा कर्जपुरवठा केला असून, त्यात वार्षिक 25 टक्के वाढ झाली आहे. संपूर्ण वित्तीय वर्षात एक लाखांपेक्षा अधिक ट्रॅक्टरसाठी वित्तपुरवठा करण्याचा महत्त्वाचा टप्पा साध्य केला आहे. ही कंपनी विस्तारीकरणाच्या वाटेवर वेगाने निघाली असून, पुढील तीन वर्षांत ती एक लार्ज कंपनी म्हणून दिसणार आहे. त्यामुळे एल अ‍ॅण्ड टी फायनान्सचा अवघ्या 92 रुपयाला असलेला समभाग ही सुवर्णसंधी आहे. दरमहा पाच-दहा शेअरच्या रुपाने संचय करत राहिल्यास पुढील 10 वर्षांत उत्तम धनसंचय सहज शक्य आहे.

… या लेखात देण्यात येणारे गुंतवणुकीचे सल्ले लेखक अभ्यास करून देत असतात. पण; गुंतवणुकीत जोखीम ही असतेच. ती लक्षात घेऊनच गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.

हेही वाचा:

Back to top button