नाशिकमध्ये कोथिंबिरच्या जुडीला 200 रुपयांचा विक्रमी भाव! | पुढारी

नाशिकमध्ये कोथिंबिरच्या जुडीला 200 रुपयांचा विक्रमी भाव!

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (दि.१३) सायंकाळी झालेल्या लिलावात गावठी कोथिंबिरच्या जुडीला तब्बल 200 रुपयांचा भाव मिळाला. चालू वर्षातील हा विक्रमी भाव असून, संबंधित शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले आहे.

नाशिक कृषी उपन्न बाजार समितीत जिल्हाभरातून पालेभाज्यांची आवक होत असते. बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे पालेभाज्यांचे लिलाव झाले. यावेळी शिवांजली कंपनीत सिन्नर तालुक्यातील कोनांबे गावातील शेतकरी विठ्ठल अर्जुन पवार हे कोथंबीर घेऊन आले होते.

या शेतकऱ्याने एकूण 453 जुड्या आणलेल्या होत्या. लिलावात यांच्या कोथंबीरीस शेकडा वीस हजार पन्नास रुपये बाजार भाव मिळाला. सदर कोथिंबीर विरार बी. या व्यापाऱ्याने घेतल्याची माहिती शिवांजली कंपनीचे संचालक चंद्रकांत निकम यांनी दिली. चालू वर्षात कोथिंबीरला मिळालेला हा विक्रमी भाव असून, शेतकऱ्याच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या फळभाज्या व पालेभाज्या या शेतमालाला लिलावाद्वारे योग्य बाजारभाव मिळत असतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त शेतमाल नाशिक बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा.
अरुण काळे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक

Back to top button