नाशिक : पाणी कपातीवरून ठाकरे गटाचा शिंदे गटावर निशाणा, भाजपचीही कोंडी | पुढारी

नाशिक : पाणी कपातीवरून ठाकरे गटाचा शिंदे गटावर निशाणा, भाजपचीही कोंडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल निनो वादळामुळे यंदा पर्जन्यमान कमी होण्याचा अंदाज वर्तविल्यानंतर शहरात पाणीकपात करण्याच्या हालचाली वाढल्या. महापालिका प्रशासनाने चालू महिन्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला होता. मात्र, ठाकरे गटाने पाणीकपातीच्या निर्णयाची घाई कशाला, असा पवित्रा घेत त्यास विरोध दर्शविला. वास्तविक, ठाकरे गटाने पाणीकपातीच्या निर्णयाला विरोध दर्शवून शिंदे गटासह, भाजपची एकप्रकारे कोंडी केल्याची चर्चा सध्या रंगत आहे. दरम्यान, राज्य शासनाने पाणीकपातीच्या निर्णयाचा चेंडू महापालिका प्रशासनाच्या कोर्टात टाकल्याने प्रशासनाला राजकीय रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

मागील महिन्यात राज्य शासनाने महापालिका आयुक्तांसह सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना पाणीटंचाईबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नाशिक महापालिकेने टंचाईबाबतचा प्रस्ताव सादर करीत चालू एप्रिल महिन्यात आठवड्यातून एक, तर जून आणि जुलै महिन्यात आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचे नियोजन केले होते. मात्र, ठाकरे गटाने पाणीकपातीच्या निर्णयाला विरोध दर्शविल्याने, महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मार्गदर्शनाकरिता पाठविला होता. यावर मंगळवारी (दि.११) मंत्रालयात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. तसेच धरणातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन स्थानिक पातळीवरच याबाबतचा निर्णय घेतला जावा, असे निर्देश दिले.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाणीकपातीचा निर्णय परवडणारा नसल्याने या निर्णयाचे कोणताही पक्ष समर्थन करणार नाही, अशीच स्थिती आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे (शिंदे गट) असल्याने साहजिकच महापालिकेत शिंदे गटाचा वरदहस्त आहे. अशात हा निर्णय त्यांच्याशी निगडित असल्याचा संदेश जनतेमध्ये जाऊ शकतो. याचा प्रभाव शिंदे गटासह भाजपवरही पडू शकतो, या विचाराने ठाकरे गटाने अगोदरच चाल खेळत पाणीकपातीच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. ठाकरे गटाची ही चाल शिंदे गटासह भाजपला मात देणार काय? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.

जनआंदोलन उभारणार : बडगुजर

ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी मनपाने पाणीकपातीचा निर्णय घेतल्यास जनआंदोलन उभारू, असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण समूहात १४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असताना नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट का? असा प्रश्न उपस्थित करीत विरोध दर्शविला आहे. त्यांचा हा विरोध शिंदे गटासह भाजपला कोंडित पकडण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button