नाशिकमध्ये कोरोना प्रतिबंधित लशींचा साठा संपुष्टात, लसीकरण ठप्प | पुढारी

नाशिकमध्ये कोरोना प्रतिबंधित लशींचा साठा संपुष्टात, लसीकरण ठप्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने, आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील को-व्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लशी संपल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे शहरातील लसीकरण ठप्प पडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दररोज २० ते ३० कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाकडून दक्षता पाळण्याच्या सूचना केल्या जात आहेत. त्याचबरोबर ज्यांनी अजूनही लसीकरण केले नाही किंवा ज्यांचा दुसरा किंवा बूस्टर डोस शिल्लक आहे, अशांनी तत्काळ लसीकरण करून घेण्याच्या सूचना केल्या जात आहेत. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे लसीच शिल्लक नसल्याने, लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकडे पाठ फिरविली होती. परिणामी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे 300 पेक्षा अधिक डोस पडून होते. नागरिक लसीकरण करीत नसल्याने गेल्या ३१ मार्चला या लसी कालबाह्य झाल्याने त्यांची अक्षरश: विल्हेवाट लावावी लागली. सद्यस्थितीत महापालिकेकडे एकही लस शिल्लक नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कोरोनाचे रुग्ण सातत्याने समोर येऊ लागल्याने, नागरिकांचा पुन्हा एकदा लसीकरणाकडे कल वाढत आहे. परंतु लशी शिल्लक नसल्याने, लसीकरणासाठी नागरिकांची धावपळ होत आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे माहिती घेतली असता, शासनाकडून जोपर्यंत लशी प्राप्त होऊ शकत नाही, तोपर्यंत लसीकरण मोहीम सुरू केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना तत्काळ लसी उपलब्ध करून द्यावात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

३०० लशी फेकल्या

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे ३०० लशींचा साठा पडून होता. परंतु नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याने ३१ मार्च रोजी या लसी कालबाह्य झाल्या. परिणामी या लशींची विल्हेवाट लावावी लागल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

जोपर्यंत शासनाकडून लशी प्राप्त होणार नाहीत, तोपर्यंत लसीकरण मोहीम थांबवण्यात आले आहे. लशी केव्हा प्राप्त होतील हे सांगता येणार नाही. नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्यात सद्यस्थितीत लशींचा तुटवडा आहे. शासनाकडून लशी प्राप्त होताच लसीकरण सुरू केले जाणार आहे.

-बापूसाहेब नागरगोजे, मनपा आरोग्य अधिकारी.

 

Back to top button