सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त : राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका | पुढारी

सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त : राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांचे मंत्री, पोलीस आयुक्त तुरुंगात गेले. त्यामुळे आधी त्यांनी स्वत: आत्मपरीक्षण करावे. सत्ता गेल्यानंतर इतके वैफल्यग्रस्त होऊ नये, अशा शब्दात महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

ना. विखे-पाटील एका खासगी कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘फडतुस’ अशा शब्दात टीका केली, तर फडणवीस यांनी ‘काडतुस’ असे त्यास प्रत्युत्तर दिले होते. सध्या राज्यात ‘फडतुस-काडतुस’ असा वाद रंगला असून, याविषयी ना. विखे-पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, ‘ठाकरेंनी फडणवीस यांच्यावर टीका करताना आधी आत्मपरीक्षण करावे असे म्हटले. जेव्हा अडीच वर्षे ठाकरे स्वत; मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांचे मंत्री, पोलीस आयुक्त तुरुंगात गेले. माणसाने सत्ता गेल्यानंतर इतके वैफल्यग्रस्त होऊ नये. फडणवीस यांच्यावर टीका करून त्यांनी उरलीसुरली नीतिमत्ता देखील घालवली आहे. मुळात फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा त्यांना अधिकारच नसल्याचेही विखे-पाटील यांनी म्हटले.

पांजरापोळ सक्षम करणार

चुंचाळे येथील पांजरापोळची ८२५ एकर जागा उद्योगांसाठी अधिगृहीत करावी या भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्यासह उद्योजकांच्या मागणीवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पांजरापोळला सक्षम करण्याची भूमिका व्यक्त केली. संस्थेतील गायींचे संवर्धन करण्यासाठी पाठबळ देण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले. मंगळवारी (४) जिल्हा दौऱ्यावर असताना ते माध्यमांशी बोलत होते.

Back to top button