

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाहनतळांव्यतिरीक्त इतरत्र वाहने उभी केल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे अशा वाहनांवर टोइंग कारवाई केली जात होती. टोइंग कारवाईदरम्यान वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याने शहर पोलिसांनी गत महिन्यात टोइंग कारवाई बंद केली. त्याऐवजी बेशिस्त वाहनचालकांवर ई-चलनमार्फत कारवाई केली जात आहे. मात्र ई-चलनचा प्रभाव, धाक तातडीने बसत नसल्याने शहर पोलिस पुन्हा नव्याने टोइंग व्हॅनचा पर्याय स्वीकारण्याचा विचार करीत आहेत. यासाठी नवीन टोइंग ठेकेदार शोधला जात असून अपेक्षित व कार्यक्षमतेने टोइंग कारवाई करणाऱ्यावर टोइंगची जबाबदारी देण्याचा विचार शहर पोलिस करीत आहेत.
शहरात वाहनतळाचा प्रश्न गंभीर असून नो पार्किंग क्षेत्रात वाहने उभी केल्यास त्या वाहनांवर टोइंग कारवाई करण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्तांनी निविदा प्रक्रिया राबवून दि. ७ जुलै २०२१ पासून खासगी ठेकेदार नेमला होता. मात्र पहिल्या दिवसापासूनच वाहनचालक व टोइंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत होते. याकडे दुर्लक्ष करीत टोइंग ठेक्यास वारंवार मुदतवाढ देण्यात येत होती. शहरात वाहनतळ द्यावीत, अशी मागणी नाशिककरांकडून होत असताना पोलिसांचा भर मात्र टोइंग कारवाईवरच होता. अखेर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी १५ मार्चपासून टोइंगचा ठेका रद्द केला. त्याऐवजी बेशिस्त वाहनचालकांवर ई-चलनमार्फत कारवाईच्या सूचना वाहतूक पोलिसांना दिल्या. मात्र, त्यानंतरही वाहनतळाचा प्रश्न जैसे थेच असल्याचे चित्र शहरात आहे. त्यामुळे शहर पोलिसांकडून पुन्हा टोइंग कारवाई सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र यंदा वादग्रस्त ठेकेदारांऐवजी अनुभवी व नियमांचे पालन करीत टोइंग कारवाई करणाऱ्या ठेकेदाराचा शोध घेतला जात आहे.
लोकअदालतीकडे दुर्लक्ष
ई-चलन कारवाईत दंड केला, तरी चालकांना त्याचा धाक राहात नाही. दंडाचे पैसे न भरताही वाहनचालक निर्धास्त असतात. लोकअदालतीत त्यांना दंड भरण्यासाठी बोलावले जाते, मात्र त्यालाही अनेक वाहनचालक प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दंडाची रक्कम अनेक महिने प्रलंबित असते. अशा वेळी बेशिस्त चालकांवर कारवाईचा वचक राहात नाही. मात्र टोइंग कारवाईमुळे वेळेचा अपव्यय आणि दंड तातडीने भरावा लागत असल्याने त्या धाकापोटी वाहनचालक बेशिस्तपणे वाहने उभी करणार नाहीत, अशी अपेक्षा पोलिस व्यक्त करीत आहेत.
वाहनतळाचा प्रश्न 'जैसे थे'
शहरात अधिकृत वाहनतळांचा प्रश्न 'जैसे थे' आहे. वाहनांच्या तुलनेने पुरेसे वाहनतळ उपलब्ध नसल्याने वाहनचालक मिळेल तेथे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी 'नो पार्किंग'चा फलक नसल्याने चालक तेथे वाहने उभी करतात. मात्र त्याठिकाणीही कारवाई होत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी असते. त्यामुळे सुरुवातीला पुरेसे वाहनतळ उपलब्ध करून द्यावे, वाहनतळ व 'नो पार्किंग' चे फलक ठळकपणे लावावे व त्यानंतर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.