कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ५०० रूपये मदत द्या : बच्चू कडू | पुढारी

कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ५०० रूपये मदत द्या : बच्चू कडू

येवला : पुढारी वृत्तसेवा : सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यायला हरकत नाही. मात्र, त्यासोबतच वयोमानानुसार काम न करू शकणाऱ्या बळीराजाचा विचार होऊन त्यालाही पेन्शन द्यायला हवी, असे रोखठोक मत प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री आमदार बच्चु कडू यांनी केले. येवला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रहार उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके, जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, येवला तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन उपस्थित होते.

यावेळी बच्चू कडू म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणारे ३५० रुपये अनुदान कमी असून प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान देण्यात यावे. सरकारने शेतकऱ्यांसाठी १२ हजार कोटींची मदत दिली आहे. नुकसानीची मर्यादा दुपटीने वाढविली आहे. राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मदत केली आहे. येवल्यातील मदतीची काय अडचण आहे, त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.

प्रहार सामाजिक संघटना असूनही शिंदे गटासोबत गेल्याचे सामान्य जनतेला पटलेले नाही, या प्रश्नावर ते म्हणाले की, मी दिलेला पाठिंबा राजकीय विषय आहे. माझ्या मतदारसंघाच्या स्थानिक राजकारणाचा विचार करावा लागतो, लढण्यासाठी मजबुती आवश्यक असते. त्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. आमची ताकद पाहूनच विधानसभा निवडणुकीचा निर्णय घेतला जाईल. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात पुन्हा मंत्री असाल का ? या प्रश्नावर मी सेवक म्हणून कायम दिसेल, असे उत्तर त्यांनी दिले.

हेही वाचा 

Back to top button