नाशिक : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा उच्चांक | पुढारी

नाशिक : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा उच्चांक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने उच्चांकी ६२ हजारांच्या जवळ पोहोचले असले, तरी ग्राहकांमध्ये सोने खरेदीचा उत्साह कायम राहणार असल्याचा विश्वास सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे. त्याव्यतिरिक्त घर, वाहन, इलेक्ट्रिक वस्तूंसह कपडा बाजार तसेच पूजेच्या साहित्यामध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

गुढीपाडव्यानिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरांमधील बाजारपेठा सजल्या असून, या मुहूर्तावर मोठ्या उलाढालीची शक्यता आहे. विशेषत: सोने खरेदीला सर्वाधिक प्राधान्य दिले जाऊ शकते. कारण गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदी शुभ मानली जाते. याव्यतिरिक्त गुढीपाडव्याला गृहप्रवेशदेखील केला जात असल्याने, रिअल इस्टेट क्षेत्रालाही झळाळी मिळणार आहे. सध्या शहराच्या चहुबाजूने मोठमोठे बांधकाम प्रकल्प सुरू असून, त्यातील रेडीपझेशन घरांची संख्यादेखील मोठी आहे. अशात ग्राहक आपल्या हक्काच्या घरात गुढी उभारण्यास उत्सुक असल्याने घराची चावी मुहूर्तावर ग्राहकांकडे सोपविण्याचे आव्हान बांधकाम व्यावसायिकांसमोर असणार आहे. त्याचबरोबर वाहन बाजारातही मोठी उलाढाल अपेक्षित आहे. चारचाकी वाहनांमध्ये जवळपास सर्वच कंपन्यांचे नवनवीन मॉडेल्स बाजारात आले असून, यातील बहुतांश मॉडेल्सना वेटिंग आहे. अशात अनेक ग्राहकांनी गृढीपाडव्याच्या मुहूर्तावर कार मिळावी, अशा बेताने अगोदरच बुकिंग केले आहे. अशीच काहीशी स्थिती दुचाकींचीही असून, मोठ्या प्रमाणात चारचाकी आणि दुचाकींची डिलिव्हरी दिली जाण्याची शक्यता आहे. होम अप्लायसेंसमध्येही मोठ्या उलाढालीचा अंदाज वर्तविली जात आहे. फ्रीज, वाॅशिंग मशीन, मोबाइल, कूलर, एसी, ओव्हन आदी वस्तूंना मोठी मागणी आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यांची मोठी खरेदी केली जाणार आहे. दरम्यान, गुढीपाडव्याचा मुहूर्त लक्षात घेऊन विविध ऑफर्सही जाहीर करण्यात आल्या आहेत. खरेदीवर विविध सवलतींबरोबरच वित्तीय साहाय्याच्या आकर्षक योजनांचाही त्यामध्ये समावेश असून काही ठिकाणी शून्य टक्के व्याजदरानेही ही सुविधा उपलब्ध केली आहे.

पूजेच्या साहित्याला मागणी वाढली

बाजारात हार, फुले, फळे व इतर किराणा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. वेळूची काठी, उटणे, सुगंधित तेल, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, केशरी रंगाचे मोठे वस्त्र, कडुनिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेचे कडे व माळ, तांब्याचा गडू, सुतळी, पाट, रांगोळी, दाराला लाल फुलांसहीत आंब्याचे तोरण, निरांजन, अगरबत्ती, नागलीचे पाने, फळे, सुपारी, तांब्या, ताम्हण, पळी, पेला, हार, सुटी फुले आदी पूजेचे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी बघावयास मिळत आहे. त्याचबरोबर मिठाईमध्ये श्रीखंड, बासुंदी खरेदीलाही प्राधान्य दिले जात आहे.

सोन्याचा दर असा राहील…

२४ कॅरेट प्रति १० ग्रॅम – ६१ हजार १००

२२ कॅरेट प्रति १० ग्रॅम – ५६ हजार ८००

सोन्याचे भाव वाढणार हे ग्राहक जाणून आहेत. अमेरिकेच्या दोन बँका बुडाल्या. आणखी काही बँका बुडतील अशी चर्चा आहे. त्यामुळे अनेकजण बँकांमधून ठेवी काढून सोन्यात गुंतवणूक करीत आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचा मुहूर्त असल्याने, यादिवशी सामान्यातील सामान्य व्यक्ती खरेदी करीत असतो. मात्र, ग्राहकांनी होलमार्कचे दागिनेच खरेदी करावेत. – चेतन राजापूरकर, संचालक, इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशन.

हेही वाचा:

Back to top button