जळगाव: कुशीनगर एक्सप्रेसमध्ये बॅग पेटली; प्रवाशाच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ | पुढारी

जळगाव: कुशीनगर एक्सप्रेसमध्ये बॅग पेटली; प्रवाशाच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : कुशीनगर एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाच्या बॅगने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. मात्र तरूणाने प्रसंगावधान राखत बॅगेची आग विझवून लागलीच बाहेर फेकली. यामुळे मोठा अनर्थ टळल्याने प्रवाशांनी देखील सुटकेचा नि:श्वास सोडला.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गोरखपुरच्या दिशेने जाणारी कुशीनगर एक्सप्रेस मधील इंजिनपासून तिसऱ्या क्रमांकाच्या जनरल बोगीमध्ये नांदगाव ते न्यायडोंगरी रेल्वे स्थानकादरम्यान एका प्रवाशी बॅगने अचानक पेट घेतला. सदरचा प्रकार प्रवाशांच्या लक्षात येताच डब्ब्यात एकच खळबळ उडाली. डब्ब्याच्या वरच्या बर्थवर असलेली बॅग खाली फेकली असता खाली बसलेल्या अजय अशोक मगरे (वय २३) या युवकाच्या बाजुला पडली. अजयने पायाने आग विझविण्याच्या प्रयत्न केला. यामुळे त्याच्या पायास किरकोळ इजा झाली. दरम्यान प्रवाशांनी चैन पुलिंग करुन गाडी थांबवली असता, अजय याने आग लागलेली बॅग गाडीतून बाहेर फेकली. सुदैवाने पुढील होणारा मोठा अनर्थ टळला.

जनरल बोगीमध्ये वरच्या बर्थवर ठेवलेल्या बॅगेतून अचानक आवाज येवुन स्पार्किंग झाली. क्षणार्धात बॅगेला आग लागली. बॅगेजवळ बसलेल्या एका प्रवाशाने बॅग खाली फेकली. व खाली बसलेल्या अजय अशोक मगरे याच्या अंगावर ती बॅग पडली. अजयने पायाच्या सहाय्याने आग विझविण्याच्या प्रयत्न केला असता त्याच्या पायाला किरकोळ इजा झाली. याच दरम्यान सह प्रवाशांनी चैन पुलिंग करुन गाडी थांबवली. अजय याने सदरची बॅग गाडी बाहेर फेकल्याने पुढील अनर्थ टळला.

बॅग मध्ये नेमके होते काय ?

दरम्यान आरपीएफ यांनी बोगी चेक करुन गाडी पाचोरा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर अजय मगरे यास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात चाळीसगाव पोलिसांनी अजय मगरे यांच्याकडून घटनाक्रम ऐकून जबाब नोंदवला आहे. नांदगाव ते न्यायडोंगरी रेल्वे स्थानकादरम्यान पेट घेतलेल्या बॅगेत नेमके होते तरी काय? याची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी नाशिक येथील फॉरेंन्सिक टीम दाखल झाली असून बॅगेची सखोल चौकशी करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button