

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी येथील सूत्रे हाती घेतल्यापासून धडक कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत चाळीसहून अधिक आरोपी अटक करण्याबरोबरच आज एक लाख २८ हजार रुपयांच्या तलवारींचा शस्त्रसाठा जप्त करण्यात त्यांना यश आले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ही कामगिरी केली.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुक २०२१ व नवरात्रौत्सव दरम्यान समाजकंटकांवर गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूका व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी दक्षता म्हणून नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अवैध शस्त्रांवर कारवाई करणयाचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथकाच्या मदतीने गुप्त बातमीच्या आधारे धडगाव गावात मुख्य रस्त्यावर छापेमारी केली.
एक इसम हा त्याच्या शेती औजार विक्रीच्या दुकानात लोखंडी बनावटीच्या तलवारी बेकायदेशीर कब्जात बाळगून असल्याचे त्यावेळी आढळून आले. संजय कागडा वळवी (वय ३८, ता. धडगाव, जि.नंदुरबार) असे त्याने नाव सांगितले. त्याच्या मालकीच्या टपरीची झडती घेतली असता तिथे १ लाख २८ हजार रुपये किमंतीच्या २० लहान-मोठ्या धारदार तलवारी मिळून आल्या. संजय कागडा वळवी याच्या विरुध्द धडगाव पोलिस ठाण्याला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलिस निरीक्षक संदीप पाटील पोलिस हवालदार विनोद जाधव, पोलिस नाईक जितेंद्र अहिरराव, पोलिस अमंलदार अभिमन्यू गावीत दिपक न्हावी, रमेश साळुंके यांनी केली आहे.
दरम्यान, काल एका अल्पवयीन गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त करण्यात आले त्याचबरोबर ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात २३ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येऊन ११३ वाहनांची तपासणी व २७ वाहनांवर कारवाई करण्यात आली. प्रलंबीत असलेल्या नॉनवेलेबल वॉरंटपैकी ७० नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी करुन एकूण ३७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.