महिला दिन विशेष :स्त्रीत्वाची हाक | पुढारी

महिला दिन विशेष :स्त्रीत्वाची हाक

नाशिक : प्रमिला पवार

जागतिक महिला दिनाचे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता आणणे व महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणं होय. पण खरंच तिला सगळे हक्क मिळाले आहेत का? हा प्रश्न मला पडलेला आहे. आपण भारतापुरता विचार केला, तर 8 मार्च 1943 ला पहिला महिला दिन साजरा केला होता. आता 2023 हे वर्ष सुरू आहे, म्हणजे 80 वर्षांपासून हा दिवस आपण साजरा करत आहोत, पण खेदाची गोष्ट ही की, हा दिवस एका बैलपोळ्यासारखा साजरा केला जातो. म्हणजे या दिवशी स्त्रियांचा खूप सन्मान केला जातो. त्यांच्या कार्यात त्यांचा गौरव केला जातो. इतर वेळी मात्र एक आई, पत्नी, बहीण, मुलगी म्हणून मन मारून जगायला भाग पाडलं जातं. मग प्रश्न पडतो की, स्त्री अजूनही अबला आहे की सबला?

माझ्या मते वर्षाच्या 365 दिवसांपैकी 1 दिवसच महिलांचा सन्मान केला जातो. तिचं जीवन म्हणजे हाताच्या कोपराच्या कळीसारखं असतं, कोपराला जेव्हा लागतं, तेव्हा रडताही येत नाही, सहनही होत नाही. मी एक समुपदेशक म्हणून काम करते. त्यामुळे अनेक स्त्रिया त्यांच्या वेगवेगळ्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात. कधी करिअरची समस्या, कधी मुलांच्या संगोपनातील समस्या, कधी पती-पत्नीमधील समस्या. पण माझा आतापर्यंतचा समुपदेशनातील अनुभव असा आहे की, स्त्रियांना सगळे हक्क फक्त कागदोपत्री मिळाले आहेत. सगळ्या समस्या या पुरुषांनी बनविलेल्या समाजामुळे आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, पुरुषांनी बनविलेला समाज म्हणजे काय? तर स्त्रीला तिच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करता येत नाहीत. म्हणजे तिच्या भावनिक गरजा, शारीरिक गरजा जर तिने व्यक्त केल्या तर तिला लांच्छनं लावली जातात. हे मला कुठेतरी चुकीचं दिसलं म्हणून मी कुठलाही विचार न करता बिनधास्तपणे लिहिण्याचं ठरवलं जेणेकरून ते समाजापर्यंत पोहोचावं. आपण खूप प्रगती केली आहे पण जिथे स्त्रियांच्या शारीरिक व भावनिक गरजांचा विषय येतो, तिथे आपण अशिक्षित आहोत.

स्त्रियांचं मानसिक आरोग्य धोक्यात आहे. याचं कारण म्हणजे, त्यांच्या आयुष्यातील विविध तणाव. स्त्री-पुरुष यांच्या नातेसंबंधाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, भावना व्यक्त करण्याची भीती, पती-पत्नीतील संवादाचा अभाव, स्त्री व पुरुष यांच्या सामाजिक, आर्थिक स्थानातील फरक स्त्रीच्या मानसिक आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. घरात पतीकडून होणारी लैंगिक हिंसा, वैधव्य, घटस्फोट यामुळे स्त्रीचं मानसिक आरोग्य धोक्यात आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचंसुद्धा मत आहे. मोकळा संवाद नसल्यामुळे व संस्कृतीच्या पगड्यामुळे स्त्रियांच्या भावनांचे दमन होत असल्यानेच त्या मानसिक आजाराला बळी पडत आहेत. ‘फिमेल ऑरगॅझम डिसऑर्डर’ हा आजार वाढत आहे. फिमेल ऑरगॅझमची कारणे पुढीलप्रमाणे आहेत – त्रासदायक लैंगिक अनुभव, जोडीदाराकडून होणारा मानसिक छळ, गर्भधारणा राहण्याची भीती, जोडीदाराकडून नाकारलं जाण्याची भीती, स्त्रियांनी ऑरगॅझमला सामोरे जाणे निषिद्ध मानणार्‍या समाजाची भीती, जोडीदाराबरोबरच्या मानसिक समस्या, आर्थिक समस्या, सेक्सबद्दल अपराधी भावना, सेक्सबद्दल सांस्कृतिक किंवा नैतिक बंधन किंवा तीव्र नैराश्य या गोष्टी करणीभूत आहेत. माझ्याकडे समुपदेशनासाठी आलेल्या स्त्रियांना मी ‘सीबीटी’च्या माध्यमातून त्यांचे विचार बदलते. त्यांना नवा विचार, नवा दृष्टिकोन देऊन त्यांची भीती, अंधश्रद्धा, समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करते. नंतरच्या सेशनमध्ये पती-पत्नी दोघांना बोलावून मोकळे बोलायला लावते. ‘एनएलपी’च्या माध्यमातून मेंदूतले चुकीचे विश्व बदलण्याचा प्रयत्न करते. स्त्रीमध्ये अफाट शक्ती आहे. ती भावनिकरीत्या खंबीर आहे. तिच्याकडे कोणतेही नाते धरून ठेवण्याची शक्ती आहे. फक्त तिने बोलले पाहिजे. तिचे छे म्हणजे धएड आहे हा समाजाचा समज चुकीचा आहे हे सिद्ध केलं पाहिजे. हे तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा ती मोकळेपणाने संवाद साधेल. मगच आपणास गर्वाने महिला दिन साजरा करता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं की, देशाची प्रगती त्या देशांतील स्त्रियांची स्थिती कशी आहे यावर अवलंबून असते.

(लेखिका सीईओ, ब्रेन सिक्रेट पर्सनल डेव्हलपमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट,
नाशिकच्या समुपदेशक आहेत)
(मो. 8830256368)

फक्त आजची पूर्ती नाही
तुझा उत्सव म्हणून
फक्त आजच आरती नको
ओठातला आणि पोटातला
तुझा आवाज जन्माला घाल !
प्रत्यक्ष काळही बदलेल
मग नव्या युगाची चाल !!

Back to top button