नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरात थंडी-तापाच्या रुग्णांत वाढ | पुढारी

नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरात थंडी-तापाच्या रुग्णांत वाढ

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच उन्हाचा कडाका वाढला असून, सकाळ-सायंकाळी थंडी, तर दुपारी उन्हाचा कडाका जावणत आहे. या बदलत्या वातावरणामुळे थेटे थंडी-तापाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच शहरात भाविक, पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने साथीचा आजार पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या त्र्यंबकेश्वर येथे दररोजची हजारो भाविकांची गर्दी होत आहे. शहरात थंडी, ताप, खोकला अशा आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. संत निवृत्तिनाथ यात्रा संपल्यानंतर नागरिकांना घशाच्या आजाराने त्रस्त केले होते. महिनाभरात काही प्रमाणात त्यात उतार पडला. मात्र, महाशिवरात्री उत्सवानंतर आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. घरोघर रुग्ण दिसत आहे. त्र्यंबकेश्वर येथील खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. त्याचसोबत उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणी कक्षात रुग्णांच्या रांगा लागत आहेत. यामध्ये महिला आणि बालकांमध्ये ताप, खोकला या आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. शहरात दररोज होणारी हजारोंची गर्दी आणि तशात सर्वत्र साचलेला कचरा यामुळेदेखील आजारपणात वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच उष्णता वाढत असल्याने डासांचा प्रादुर्भावदेखील वाढत आहे. त्र्यंबक नगरपालिकेत सध्या प्रशासकीय कारभार असल्याने तक्रारी कोणाकडे करायच्या, असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता शहराची स्वच्छता नीटनेटकी झाली आणि जंतुनाशकांची फवारणी झाली तर आजारांना आळा बसेल. मात्र, याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. तर सर्दी-ताप-थंडीच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, शहरासह उपनगरांतील लहान-मोठ्या रुग्णालयांसह तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना खबरदारी म्हणून रक्त, लघवीसह अन्य विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यांचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

हेही वाचा:

Back to top button