नाशिक : अपघाती मृतांमध्ये 25 टक्के पादचारीच | पुढारी

नाशिक : अपघाती मृतांमध्ये 25 टक्के पादचारीच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात वाहतूक नियमांचे पालन न केल्याने होणार्‍या अपघातांमध्ये दरवर्षी सरासरी 180 जणांचा मृत्यू होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मृतांपैकी 25 टक्के मृत्यू पादचार्‍यांचे आहेत. त्यामुळे शहरात अपघातात दरवर्षी 40 ते 50 पादचार्‍यांचा अपघाती मृत्यू होत असून, बेदरकार वाहनचालक पादचार्‍यांच्या जिवावर उठल्याचे वास्तव आहे. अपघातांमध्ये 239 पादचारी गंभीर जखमी झाले आहेत.

वाढत्या शहरीकरणासोबत वाहनांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे शहरात वाहतूक शिस्त लागावी यासाठी वाहतूक शाखेतर्फे नियमांची चालकांनी अंमलबजावणी करावी, असा आग्रह असतो. त्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जाते. तरीही अपघातांचे प्रमाण कमी होत नसून त्यात अनेकांना जीव गमवावा लागत असून, काहींना कायमचे अपंगत्व किंवा गंभीर दुखापती झाल्या आहेत. मृतांमध्ये वाहनधारक, सायकलस्वारांसह पादचार्‍यांचाही समावेश आहे. शहरात दरवर्षी सरासरी 448 अपघात होतात. त्यात अंदाजे 180 जणांना जीव गमवावा लागतो, तर 400 हून अधिक जणांना दुखापतींचा सामना करावा लागतो. मृतांमध्ये दरवर्षी 40 हून अधिक पादचार्‍यांचा समावेश असतो. त्यामुळे शहरात रस्त्यावरून चालताना पादचार्‍यांना अक्षरश: जीव मुठीत धरून चालावे लागत असल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांच्या निरीक्षणानुसार पथदीप नसल्याने अंधारात अपघात होणे, फुटपाथचा अभाव किंवा अतिक्रमणामुळे पादचारी रस्त्यावरूनच चालत असल्याने अपघात होतात, सिग्नल न पाळणे, बेदरकारपणे वाहने चालवणे, उलट दिशेने वाहने वेगात चालवणार्‍यांमुळे पादचार्‍यांचा जीव धोक्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button