नाशिक : संतप्त ग्रामस्थांच्या रास्ता रोकोनंतर आली जाग; 15 दिवसांत रस्त्याचे काम सुरू होणार

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
सटाणा – ताहाराबाद रस्त्याच्या समस्येबाबत प्रशासनास वेळ देऊनही रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याने गुरुवारी (दि. 9) संतप्त ग्रामस्थांनी तरसाळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.
विंचूर – प्रकाशा महामार्ग – 7 चे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून नवीन रस्ता काँक्रिटीकरणाचे काम शासनाच्या वतीने सुरू आहे. परंतु, संबंधित ठेकेदाराकडून कामात दिरंगाई होत आहे. प्रशासनही ठेकेदाराला पाठीशी घालत आहे. परिणामी, गेल्या तीन वर्षांपासून काम संथगतीने होत आहे. ते अद्यापही पूर्णत्वास जाण्यास तयार नाही. राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्यानंतर रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. वनोली ते सटाणादरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम ठेकेदाराच्या मनमर्जीने होत आहे. एक ते दीड महिन्यापासून काम पूर्णपणे ठप्प आहे. ठिकठिकाणी खोदकाम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे प्रमाण वाढलेले आहे. बहुतांश वेळा धुळीचे इतके लोट उठतात की, वाहनचालकांना समोरील वाहनही दिसत नाही. त्यातून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारत येत नाही. दोन दिवसांपूर्वी औंदाणेजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर रस्त्यावर उलटला होता. रस्त्यावर पडलेली खडी व दगड-गोटे वाहनाच्या वेगामुळे हवेत उडतात. त्यातून रस्त्याच्या कडेला चालणारे आणि धावणार्या वाहनांना हे उडालेले दगड धोकेदायक ठरतात. तसेच धुळीमुळे होणारे वायुप्रदूषण मानवी तसेच पशू, पक्षी यांच्या आरोग्याच्या समस्या वाढवत आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पिकांवर धुळीचा थर बसत असून, परिणामी पिकांची वाढ खुंटली आहे. यातून उत्पन्नात घट होणार आहे. विविध कारणांनी अडचणीत आलेल्या शेतकर्यांपुढे ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत दि. 20 जानेवारीला तरसाळीचे माजी सरपंच लखन पवार, वनोलीचे सरपंच शरद भामरे, औंदाणेचे सरपंच भरत पवार, साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे यांच्या नेतृत्वाखाली बागलाण उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन प्रजासत्ताकदिनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.त्यांनतर एमएसआरडीसी विभागाचे अधिकारी यांनी रस्त्याची पाहणी करून नागरिकांची भेट घेत आंदोलनापासून परावृत्त केले होते. परंतु प्रशासनास वेळ देऊनही रस्त्याचे काम सुरू होत नसल्याने संतप्त नागरिकांनीे गुरुवारी (दि. 9) तरसाळी फाटा येथे ठाण मांडून राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.
आंदोलनस्थळी सटाणा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी बाजार समिती संचालक प्रभाकर रौंदळ, ग्रामपंचायत सदस्य दीपक रौंदळ, गणेश निकम, किशोर खैरनार, तंटामुक्ती अध्यक्ष राकेश रौंदळ, ‘प्रहार’चे तुषार खैरनार, संजय भामरे, प्रशात मोहन, राजेंद्र मोहन, उमेश रौंदळ, तुषार रौंदळ, गणेश रौंदळ, कोमल निकम, पुंडलिक रौंदळ आदींसह ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आश्वासनपूर्ती न झाल्यास टाळे लावणार…
यावेळी माजी सरपंच लखन पवार, भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा, प्रगतशील शेतकरी सुधाकर पाटील आदींनी मनोगत व्यक्त करून रस्त्याच्या समस्या मांडल्या. शिवाय रस्ताकामामुळे शेतकर्यांच्या होणार्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. एमएसआरडीसी विभागाचे अधिकारी डी. एस. पवार व दिलीप वानखेडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कार्यकारी अभियंता पी. एस. आवटे यांचे आंदोलकांशी भ्रमणध्वनीवर बोलणे करून दिले. त्यांनी 15 दिवसांत रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. आश्वासनपूर्ती न झाल्यास एमएसआरडीसी विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
हेही वाचा:
- नाशिकमध्ये दोन हजार गुन्हेगारांच्या मागावर पोलिस
- विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण कधी करणार? .. प्रस्ताव अजूनही धूळखात
- Stock Market Today : बाजार घसरला, सेन्सेक्स 250 अंक तर निफ्टी 17850 च्या खाली, जाणून घ्या स्टॉक मार्केटचा आजचा मूड