नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थानचा बदलणार चेहरामोहरा, 'हे' आहे कारण | पुढारी

नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थानचा बदलणार चेहरामोहरा, 'हे' आहे कारण

नाशिक : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या परिसराचा चेहरामोहरा हळूहळू बदलतो आहे. भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था तसेच भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता नजरेसमोर ठेवून मंदिर परिसरात कामे होत आहेत. पुरातत्व विभागाची परवानगी घेऊनच ही कामे सुरु आहेत.

केंद्र सरकारची प्रसाद योजना व देवस्थानकडील निधी यातून सुमारे चाळीस कोटींची एकत्रित कामे मंदिर परिसरात सुरू असून, यातून त्र्यंबकेश्वर देवस्थानचा चेहरामोहरा बदलणार आहे. देवस्थानचे अध्यक्ष न्यायाधीश विकास कुलकर्णी आणि विश्वस्त मंडळातर्फे तशी माहिती देण्यात आली आहे.

मुघलांच्या काळात मंदिर पाडण्यात आले होते…

त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. बाराव्या शतकामध्ये यादव काळात त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग मंदिराची उभारणी केली. मुघलांच्या काळात मंदिर पाडण्यात आले. पेशवाईमध्ये नानासाहेब पेशवे यांच्या कार्यकाळात अहल्यादेवींनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला. या मंदिराचे १७५५ ते १७८६ या काळात सोळा लाख रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

आता, त्र्यंबकेश्वर मंदिरात दिवसेंदिवस भाविकांचा ओघ वाढतो आहे. तीर्थस्नान, दर्शन, पूजा-विधीसाठी वर्दळ वाढते आहे. मात्र, त्र्यंबकेश्वरनगरी ब्रह्मगिरी पर्वत रांगेच्या पायथ्याशी असल्याने विकासासाठी उपलब्ध जागेचा प्रश्न आहे. यातून मार्ग काढत त्र्यंबकेश्‍वर देवस्थान व केंद्र सरकारची प्रसाद योजना यातून ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्‍वर मंदिर परिसरात विविध विकामकामे सुरू आहेत. देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे दर्शन रांगा कायम स्वरूपी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भाविकांना वातानुकूलित व्यवस्थेसह गर्भगृह दर्शनासाठी मोठ्या आकाराचे स्क्रीन लावण्यात आले आहेत.

गर्भगृहाला चांदीचा दरवाजा

येथील गर्भगृहाला तर आता चांदीचा दरवाजा बसविण्यात आला आहे. सर्वत्र विद्युत आणि मंदिर परिसरात दगडी कोटाचे काम सुरू आहे. मंदिरात काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वराच्या वज्रलेपनाचे काम करण्यात आले आहे. त्यासाठी मंदिर काही दिवस बंदही ठेवण्यात आले होते.

पुरातत्त्व विभागाकडून परवानगी घेत ही सर्व कामे करण्यात येत आहेत. देवस्थानच्या भाविकांच्या निवास व्यवस्था इमारतीचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. यात्रेकरूंच्या निवासासाठी अद्ययावत व्यवस्था केली जाते. इमारतीच्या सभागृहात प्रसाद व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय अनेक कामे मंदिर परिसरात होत आहेत. त्र्यंबकेश्‍वर मंदिर १९४० पासून केंद्रीय संरक्षित स्थळ म्हणून अंतर्भूत करण्यात आले आहे. त्यामुळे इथे बदल करण्यात अडचणी येत आहेत.

मंदिर परिसरातील कामे

– दर्शनासाठी वातानुकूलित रांग व्यवस्था. यात बसण्याची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची सोय.
अद्ययावत प्रसाधनगृहे, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दहा ते बारा कोटींचा खर्च
– मंदिराच्या सभोवताली हद्दीतील दगडी भिंत आणि स्वतंत्र विद्युतव्यवस्था
– शिवप्रसादालय या देवस्थानच्या इमारतीची डागडुजी व निवासव्यवस्था, प्रसादालय
– मंदिरातील विद्युतीकरण व आरसे महाल दुरुस्ती
– सुरक्षेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे

Back to top button