आमदार सत्यजित तांबे : निवडणुकीत प्रदेश स्तरावरून दिले चुकीचे एबी फॉर्म | पुढारी

आमदार सत्यजित तांबे : निवडणुकीत प्रदेश स्तरावरून दिले चुकीचे एबी फॉर्म

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक पदवीधर निवडणुकीत पक्षाच्या प्रदेश स्तरावरून आपल्याला चुकीचे एबी फॉर्म देतानाच राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि तांबे कुटुंबीयाला काँग्रेस पक्षाबाहेर घालवून संपविण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे. तसेच ही स्क्रिप्ट लिहिण्यामागे पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हात असल्याचा आरोप करतानाच दिल्लीतून पक्षपातळीवरून त्यांच्यावर कारवाई होणार का, असा सवालही आ. तांबे यांनी उपस्थित केला आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करत निवडून आलेले आ. तांबे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गेल्या महिनाभरापासून काँग्रेस पक्षातून विविध आरोप करण्यात आले. आ. तांबे यांनी शनिवारी (दि.4) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत या आरोपांना चोख प्रत्युतर दिले. नाशिक पदवीधरकरिता अर्ज भरण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना प्रदेश स्तरावरून औरंगाबाद व नागपूर शिक्षक मतदारसंघाचे स्वाक्षरी केलेले चुकीचे कोरे एबी फॉर्म देण्यात आल्याचा आरोप तांबे यांनी केला. याबाबत प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याशी संपर्क साधला असता ऐनवेळी नवीन एबी फॉर्म देण्यात आला. मात्र, त्यावर डॉ. सुधीर तांबे यांचेच नाव होते. त्यामुळे निवडणुकीत मी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला, तरी त्यासोबत एबी फॉर्म नसल्याने माझी उमेदवारी अपक्ष झाल्याचा दावा तांबेंनी केला. प्रदेश स्तरावरून माझ्या नावाचा एबी फॉर्म न देणे ही तांबे व थोरात कुटुंबाच्या बदनामीसाठी रचलेली स्क्रिप्ट असून, त्याची सुरुवात आपल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित यांना संधी द्या. अन्यथा आमचे त्यांच्यावर लक्ष आहेे, या वक्तव्यापासून सुरू झाल्याची शक्यता त्यांनी वर्तविली. त्या क्षणापासूनच माझ्या व माझ्या कुटुंबीयांविरोधात पक्षात कटकारस्थान सुरू झाले. आपल्याला भाजप प्रवेश करायचा असता, तर चुकीचे एबी फॉर्म आल्याचे काँग्रेसला कळविले नसते, असे सांगताना राज्यातील अन्य जागांचे उमेदवार प्रदेश स्तरावरून घोषित झाले. केवळ नाशिकचा उमेदवार दिल्लीतून कसा घोषित झाला, असा प्रश्न तांबेंनी उपस्थित केला. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण एच. के. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलले नाहीत. तर पटोलेंचा फोन बंद असल्याचा दावाही त्यांनी केला.

निवडणुकीतील उमेदवारीवरून दिल्लीतील पक्षाच्या हायकमांडकडून जाहीर माफी मागण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आपण माफी मागण्यासही तयार होतो. परंतु, दिल्लीशी चर्चा सुरू असताना पटोले यांनी दुसर्‍याच उमेदवाराला पाठिंबा घोषित केल्याचा आरोप तांबेंनी केला. या सर्व प्रकारामागे थोरात यांचा काँग्रेसमधील वाढता राजकीय प्रभाव असून, थोरात, तांबे कुटुंबाला पक्षातून बाहेर काढत संपविण्याचा डाव असल्याचा आरोप तांबेंनी केला. पक्षाचे नेते राहुल गांधी एकीकडे भारत जोडो यात्रा काढतात. काँग्रेसचे हाथ से हाथ जोडो अभियान सुरू असताना सध्या पक्षात पैर में पैर अडकाने का काम शुरू है, अशी टीकाही तांबेंनी केली. निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, रासप, शिवसेनेसह 100 संघटनांचा आपल्याला पाठिंबा मिळाल्याचा दावा तांबेंनी केला.

पाच मिनिटांत निलंबन कसे?
काँग्रेसने पाच मिनिटांमध्ये पक्षातून माझे वडील डॉ. तांबे यांचे निलंबन केले. पण, नियमानुसार निलंबन करताना पहिले कारणे दाखवा नोटीस बजावून बाजू मांडण्याची संधी देण्यात येते. मात्र, तशी कोणतीच संधी पक्षाने दिली नसल्याबद्दल आ. तांबे यांनी खंत व्यक्त केली. तसेच मी आजही काँग्रेसमध्येच असून, पक्षानेच आपल्याला निलंबित केल्याचे ते म्हणाले. आपल्यासोबत घडलेल्या प्रकारावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार होतो. मात्र, भारत जोडो यात्रेत ते व्यस्त असल्याने संधी मिळाली नाही, असे तांबे म्हणाले.

ना. फडणवीस मार्गदर्शक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले मार्गदर्शक आहे. वेळेप्रसंगी मी त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, शिवसेनेसह अन्य सर्व पक्षांमधील ज्येष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन घेत राहील, असे तांबे यांनी सांगितले. दरम्यान, निवडणुकीवेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे गंभीर आजारी असल्याने या संपूर्ण घडामोडीत ते कुठेही पुढे आले नाही, असेही तांबेंनी स्पष्ट केले.

मी अपक्षच राहणार : तांबे
पदवीधर निवडणुकीत अपक्ष निवडून आल्याने यापुढे आपण अपक्षच काम करणार असल्याची भूमिका आ. सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केली. जुनी पेन्शन योजना, युवकांचे प्रश्न व शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारवर दबाव आणणार असल्याचे तांबे यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button