नाशिक : लासलगावी दवबिंदूंमुळे द्राक्षाला फटका | पुढारी

नाशिक : लासलगावी दवबिंदूंमुळे द्राक्षाला फटका

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
अफगाणिस्तान आणि त्याच्या शेजारच्या भागात तीव्र पश्चिमी चक्रवात तयार झाले आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. हवामानातील या बदलाचा परिणाम सोमवारी (दि. 30) नाशिक शहर व परिसरावर झालेला पाहायला मिळाला. हवेतील आर्द्रता वाढल्याने पहाटे शहर धुक्यात हरविले होते.

ग्रामीण भागात कामे मंदावली असून निफाडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी धुके दाटले होते. वातावरणातील या बदलाने द्राक्षबागा धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. धुक्यामुळे पहाटेच्या वेळी शेतीची कामे मंदावली होती. सोमवार दि. 30 ची पहाट गुलाबी थंडी अन् दाट धुके असे मनमोहक दृश्य लासलगाव शहर व परिसरात पाहायला मिळाले. वाहनचालकांना धुक्यामुळे रस्ताही दिसत नव्हता. तर या दाट धुक्याबरोबर दवबिंदू मोठ्या प्रमाणात असल्याने सोनाका, माणिकचमण या तयार झालेल्या द्राक्षमण्यास तडे जाण्याची दाट शक्यता आहे.

वाहनचालकांकडून रस्त्याचा अंदाज घेत दिवे सुरू ठेवून कांदा आणि शेतमालाने भरलेली व इतर वाहनांची वाहतूक संथगतीने सुरू होती. पाच-दहा फुटांवरील घरे, इमारती, वाहनेही धुक्यामुळे दिसत नव्हती. धुक्यामुळे वाहनांचा वेगही मंदावला होता. दरम्यान, धुक्यामुळे कांदा पिकांवर करपा, मावा या रोगांचा प्रादुर्भाव अधिक वाढेल, अशी माहिती ब्राह्मणगाव विंचूर येथील शेतकरी सुनील गवळी यांनी दिली. धुक्याची चादर ओढून घेतलेले रस्ते आणि इमारती अशा ’धुकेमय’ वातावरणाची अनुभूती लासलगावकर घेत आहेत. पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर शहरावर ओढल्याचे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले आहे. शहराच्या विविध भागांत सकाळी धुके पडले. पहाटे धुक्याचे सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि कॅमेर्‍यात टिपण्यासाठी हौशी छायाचित्रकार बाहेर पडू लागले आहेत. व्यायामासाठी घराबाहेर पडणारी मंडळीही धुक्याचा मनमुराद आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळते.

हेही वाचा:

Back to top button