जळगाव : जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन | पुढारी

जळगाव : जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पुण्यातील एका सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावरुन विरोधक आक्रमक झाले असून, जामनेर शहरात आज (दि. ७) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

पुणे येथील शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली होती. पुरस्काराच्या संदर्भात बोलताना माझ्या तोंडून अनावधानाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख झाला असेल. तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, असे म्हणत यामध्ये राजकारण करू नये, असे महाजन यांनी म्हटले आहे. महाजनांच्या माफीनाम्यानंतरही आज जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीन आंदोलन करण्यात आले.

गिरीश महाजन यांच्याविरोधात घोषणा…

गिरीश महाजन यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एकेरी उल्लेख झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावर उतरून घोषणा देत महाजन यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड म्हणाले की, जनतेच्या मुख्य समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपचे लोक महापुरुषांचा अवमान करण्यात व्यस्त आहेत. या प्रश्नावर मंत्र्याने महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मविआच्या वतीने आम्ही सर्वांची मागणी आहे. राष्ट्रवादीकडून विलास राजपूत, किशोर पाटील, अरविंद चितोडिया तर काँग्रेसचे शंकर राजपूत, एस.टी. पाटील, रउफ शेख, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ज्ञानेश्वर बोरसे, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button