छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; गिरीश महाजनांचा माफीनामा | पुढारी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; गिरीश महाजनांचा माफीनामा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माफी मागितली आहे. पुरस्काराच्या संदर्भात बोलताना माझ्या तोंडून अनवधानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख झाला असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, असे म्हणत यामध्ये राजकारण करू नये, असेही महाजन यांनी म्हटले आहे.

पुणे येथील शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका झाली. सर्वच क्षेत्रातून टीका होऊ लागल्यानंतर गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. महाराजांचा अनादर करण्याचा माझा कुठेही हेतू नव्हता, मी महाराजांचा किती समर्थक आणि अनुयायी आहे, हे सर्वांना माहिती आहे. शेवटी महाराज हे महाराज आहेत. महाराजांच्या नावाचा माझ्याकडून अनवधानाने एकेरी उल्लेख झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, असे महाजन यांनी म्हटले आहे.

विरोधकांकडून शब्दांचे राजकारण…

विरोधक विकास कामाबद्दल बोलू शकत नाहीत. त्यामुळे ते माध्यमांत जाऊन आपला अनवधानाने बोललेला एखादा शब्द घेऊन त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, आपण महाराजांचे नेहमीच चाहते राहिले आहोत, असे म्हणत अमोल मिटकरी यांना टोला लगावला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीच गिरीश महाजन यांनी एकेरी उल्लेख केल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यावरून महाजन यांच्यावर टीकेची झोड उठू लागली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button