

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
नाशिकमध्ये ठाकरे गटाला लागलेली गळती ही काही थांबण्याचे नाव घेत नाही असेच दिसत आहे. नाशिकचे ठाकरे गटाचे जवळपास 50 पदाधिकारी व कार्यकर्ते हे आज शिंदे गटात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे या पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
ठाकरे गटाला नाशिकमध्ये लागलेली गळती थांबविण्यासाठी स्व:त उद्धव ठाकरे नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत नाशिकच्या दौ-यावर आहेत. मात्र, आजच ठाकरे गटाचे जवळपास 50 पदाधिकारी हे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठे भगदाड पडले आहे.
याआधीही नाशिकमधील तब्बल 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. खुद्द संजय राऊत यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे भाऊ चौधरी यांनी देखील ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर या माजी नगरसेवकांपाठोपाठ अनेक कार्यकर्त्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. त्यात आज पुन्हा ठाकरे गटाचे जवळपास 50 पदाधिकारी शिंदे गटात गेल्याने महापालिकेा निवडणूकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वीच ठाकरे गटाला पडलेलं हे भगदाड पाहाता ही गळती थांबविण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्या समोर आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी नाशिकमधील शिवसेना शाबूत असल्याचे म्हटले आहे. नाशिकची शिवसेना जागेवर आहे. दोन चार दलाल, ठेकेदार इकडे तिकडे गेले असतील. कोण गेलं त्यांची नावेही आम्हाला माहिती नाही अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.