नाशिक : मालेगावकरांनी अनुभवली अभूतपूर्व शिव पर्वणी | पुढारी

नाशिक : मालेगावकरांनी अनुभवली अभूतपूर्व शिव पर्वणी

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
मालेगावकरांनी आठवडाभर धार्मिक पर्वणीची अनुभूती घेतली. पोलिस कवायत मैदानावर आयोजित श्री शिव महापुराण कथा सोहळ्याचा सुमारे 11 लाख भाविकांनी लाभ घेतला. कुंभमेळ्याच्या धर्तीवर लाखो लोकांनी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुरवाणीतून कथा श्रवण करण्यासाठी उपस्थिती लावल्याने संपूर्ण सप्ताह शिवमय झाला होता. गुरुवारी (दि. 29) समारोपाला सर्वाधिक गर्दी झाल्याचे दिसून आले.

 

बस गर्दी www.pudhari.news
मालेगाव : कथा समाप्तीनंतर बाहेरगावच्या भाविकांची बसस्थानकात झालेली गर्दी. (छाया: शेखर गायकवाड)

गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत कथा चालली. त्यास जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली. प्रारंभ ते पूर्णाहुतीच्या कार्यक्रमापर्यंत महाराष्ट्रासह परराज्यातील जवळपास 10 लाख भाविकांनी उपस्थिती लावल्याचे सांगितले जात आहे. विशेषत: महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. आयोजन समिती आणि विविध सामाजिक – धार्मिक संघटनांनी उत्कृष्ट नियोजन केल्याने हजारो भाविकांना राहण्यासह निवासाची सोय झाली होती. हजारो भाविकांनी तर मंडपातच राहूनच सप्ताहाचा लाभ घेतला. समितीने बाहेरगावाहून आलेल्या भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. त्यानंतरही अनेक दानशूरांनी वेगवेगळ्या माध्यमांतून अल्पोपाहार, जलसेवा, दूधसेवा दिल्याने प्रत्येक भाविकाला कथा श्रवणाचा आनंद घेता आला. सात दिवसांची कथा निर्विघ्न आणि भक्तिभावाने पार पडली. पालकमंत्री भुसे यांनी मालेगावकरांच्या वतीने पंडित मिश्रा यांचे आभार मानले आणि कथेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल मालेगावकरांचे कौतुक केले.

संतांचे कार्य पुढे नेऊ या
समारोपाला पंडित मिश्रा यांनी शिवतत्त्वाचे महत्त्व विशद केले. शिवतत्त्व तोच जाणतो, ज्याच्या मनात शंकर असतो. मनुष्याने रोज भगवंताकडे आपली इच्छा व्यक्त करू नये, विश्वास जागृत ठेवावा, असे पंडितजींनी सांगितले. पिंडीवर वहिलेले जल रोज आपल्या मस्तकावर, डोळ्यावर आणि गळ्याला लावले, तर नवग्रहांचा कुठलाही दोष आपल्याला होत नाही. ज्यांच्या घरात पैसे टिकत नाही, त्यांच्यासाठी शिव महापुराणात दीप महत्त्व सांगितले आहे. घरात दोन दिवे लावले पाहिजेत, बेलाच्या झाडाखाली दररोज दिवा लावावा, तुमच्या घरात संपत्ती टिकेल, असा उपदेशही त्यांनी केला. महाराष्ट्रातील संतांच्या कार्याची जाणीव करून देताना, संत तुकाराम, संत नामदेव, संत मीराबाई यांना लोकांनी फार उशिरा जाणून घेतल्याची खंतदेखील व्यक्त केली. संतांनी केलेली कार्य आपण पुढे चालूच ठेवावे, आपला सनातन धर्म पाळावा, असा संदेश पंडितजींनी दिला.

बससेवाही पडली अपुरी, खासगी वाहनांचा घ्यावा लागला आधार…
श्री शिव महापुराण कथा सोहळ्याची सांगता गुरुवारी (दि.29) झाली. अखेरच्या दिवशी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. त्यासह मुक्कामी थांबलेले हजारो भाविक गुरुवारी माघारी फिरल्याने कॉलेज ग्राउंड ते रावळगाव नाका, मोसम पूल, सटाणा नाका, टेहरे फाटापर्यंतचे रस्ते ओसंडून वाहिले होते. बसेसवर अवलंबून असणार्‍या भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. शुक्रवार, दि. 23 डिसेंबरपासून श्री शिव महापुराण कथा सुरू झाली होती. दिवसागणिक भाविकांची गर्दी वाढत गेली. अखेरचे दोन दिवस कुंभमेळ्याची अनुभूती देऊन गेले. समारोपानंतर सर्वांनीच माघारीची वाट धरल्याने बसस्थानकात एकच गर्दी झाली होती. आगाराने धुळे, नाशिक, चाळीसगाव, नंदुरबार, सटाणा, नांदगाव, मनमाड आदी मार्गांवर जादा बसेस सोडल्या असल्या, तरी त्या अपुर्‍या पडल्या. काही भाविकांनी चाळीसगाव फाटा, मोसमपूल, मनमाड चौफुली तसेच महामार्गाकडे धाव घेत खासगी वाहनांचा पर्याय अवलंबला. समारोपाला होणार्‍या गर्दीचा अंदाज प्रशासनाने घेत अतिरिक्त बसेसची व्यवस्था करणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष झाले. याचा भाविकांना आणि आगाराच्या तिजोरीत जमा होणार्‍या महसुलालाही फटका बसल्याचे बोलले जात आहे. भाविकांची गर्दी पाहून मातोश्री संघटनेने 50 वाहनांची व्यवस्था केली. आयशर, 407, मिनी ट्रक आदी वाहने उपलब्ध झाल्याने भाविकांची बरीचशी सोय झाल्याचे संघटनेचे शहराध्यक्ष सुनील चांगले यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button