नाशिक : राहीबाई पोपेरे यांच्या सीड बँकेला एसएनएफचा आधार | पुढारी

नाशिक : राहीबाई पोपेरे यांच्या सीड बँकेला एसएनएफचा आधार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

सोशल नेटवर्किंग फोरम (एसएनएफ) आणि अस्ट्रल फाउंडेशनतर्फे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या शेतात ड्रीप सिस्टिम सुरू करण्याचे काम सुरू असून, यामुळे सीड बँक अर्थात, बीजनिर्मितीच्या कार्याला माेठा हातभार लागणार आहे.

मध्यंतरी बीजमाता राहीबाई पोपेरे या एसएनएफच्या हिवाळी गावच्या पाणी योजनेचे लोकार्पण करण्यासाठी आल्या होत्या. त्या दरम्यान एसएनएफचे काम बघून त्यांनी पोपेरेवाडी येथे उभारलेल्या सीड बँकेला काहीतरी मदत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर एसएनएफने राहीबाईंच्या घरी भेट देऊन काय करता येईल याची पाहणी केली. तेव्हा लक्षात आले की सीड बँकेला जिथून बियांचा पुरवठा होतो ती राहीबाईंची शेती हंगामी आहे. फक्त पावसाळ्यात इथे बीजनिर्मिती होते. या शेतीला बारमाही पाण्याची व्यवस्था झाली तर देशी वाणाचे बीज उत्पादन जास्त प्रमाणात होऊ शकते. पाहणी करून आल्यावर ताबडतोब एक अहवाल तयार करून तो अस्ट्रल फाउंडेशन या संस्थेला पाठवला. विशेष बाब म्हणजे अस्ट्रलने या प्रकल्पाला मंजुरी दिली आणि एसएनएफच्या टीमने कामाला सुरुवात केली.

सध्या ३० हजार क्षमतेच्या टाकीचे बांधकाम, एक किमीवरील विहिरीतून टाकीपर्यंतची पाइपलाइन आणि टाकीपासून राहीबाईंच्या शेतापर्यंत ड्रीपचे पाइप्स टाकण्याचे काम सुरू आहे. – प्रमोद गायकवाड, अध्यक्ष, एसएनएफ.

हेही वाचा:

Back to top button