जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव तालुक्यात वाळू माफियांचा उन्माद वाढला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक केली जात आहे. यासाठी रात्रीची गस्त सुरु करण्यात आली असून, गस्तीवर असलेल्या मंडळ अधिकाऱ्यांच्या तावडीतून वाळू चोरीचे डंपर पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसावद येथील मंडळ अधिकारी अजिंक्य आंधळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वाळू वाहतूक करणारा डंपरचालक आणि मालकाविरुध्द शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी महेश सुधाकर व वाहनचालक सुरेश महाजन हे शासकीय वाहन क्रमांक (एम. एच. 19, सी.वाय. 9991) या वाहनात अवैध गौण खनिज वाहतूक उत्खनन रोखण्यासाठी गस्तीवर गेले होते.
तीन ब्रास वाळूची अवैध वाहतूक…
यादरम्यान जळगाव शहरात काशीबाई उखाजी शाळेचे पाठीमागील बाजूस जुना खेडी रोडवरील श्री कॉलनी पॉईंटवर गस्त करीत असताना जळगाव शहरातून खेडी रोडकडे जाताना एक डंपर वाळू वाहतूक करताना आढळून आले. त्यामध्ये अंदाजे तीन ब्रास 9000 रुपये किमतीची वाळू भरलेली दिसून आली. वाहन थांबवले असता डंपर क्रमांक (एम.एच. 04, जीए 2615) आढळून आले. वाहनचालकास विचारपूस केली असता, त्याने नाव न सांगता डंपर वाहन मालकाचे नाव आकाश इच्छाराम पाटील (रा. जुना असोदा रोड, जळगाव) असे सांगितले.
वाळू रस्त्यावर फेकून काढला पळ…
डंपर चालकास वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता, त्याने वाहनपरवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर सदरचे डंपर हे जिल्हाधिकारी कार्यालय शेजारील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात घेऊन जाण्यास सूचना केली. तेव्हा स्वतः मंडळ अधिकारी वाहनाच्या केबिनमध्ये बसले त्यानंतर वाहन चालकाने वाहन मागे वळवतो असे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे न नेता, डीएनसी कॉलेजरोडने भरधाव वेगाने घेऊन जाऊन रस्त्यात थांबवले. यावेळी मंडळ अधिकाऱ्यास वाहनाच्या खाली उतरून दिले. वाहनातील वाळू रस्त्यावरच खाली करून वाहन भरधाव नेले. याप्रकरणी वाहनमालक आकाश इच्छाराम पाटील व वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.