Gram Panchayat : सी. आर. पाटलांना धक्का, मुलीचा पॅनल पराभूत | पुढारी

Gram Panchayat : सी. आर. पाटलांना धक्का, मुलीचा पॅनल पराभूत

जळगाव : संपूर्ण देशभरात गाजलेल्या गुजरात निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय झाला. या विजयाचे श्रेय जाते ते भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांना गुजरात निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर सीआर पाटलांच्या रणनीतीची देशभरात चर्चा झाली. मात्र नुकत्याच हाती आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पाटील यांच्या कन्येच्या पॅनलचा पराभव झाल्याने मोठा धक्का बसला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या गुजरात प्रदेशाध्यक्ष तथा मातब्बर खासदार म्हणून गणले गेलेले सी.आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील या जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे निवडणूकीच्या रिंगणाात उभ्या होत्या. मागील काळात त्या मोहाडी ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. या ५ वर्षात त्यांनी गावात समाधानकारक विकासकामे करून ग्रामस्थांची कौतुकाची थाप मिळवली होती.

राष्ट्रवादीने दिला होता पाठिंबा…

दरम्यान यंदा त्यांच्यासमोर प्रा. शरद पाटील यांचे पॅनल उभे होते. लक्षणीय बाब अशी की, मोहाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसने भाविनी पाटील यांच्या पॅनलला पाठिंबा दिला असला तरी भारतीय जनता पक्षाचे पॅनल त्यांच्यासमोर उभे राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. निवडणुकीच्या काळात मोठी चुरस पाहायला मिळाली होती, दरम्यान या निवडणुकीमध्ये भाविनी पाटील या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उभ्या होत्या तर त्यांचे सहकारी हे सरपंच पदासाठी उभे होते.

सरपंचपदाचा उमेदवार पराभूत…

आज लागलेल्या निकालात भाविनी पाटील यांच्या पॅनलच्या सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला असून पॅनल मधील फक्त ३ सदस्य निवडून आले आहेत. यामुळे त्यांचा येथे पराभव झाला आहे. या निवडणूकीत सरपंच म्हणून चंद्रकला रघुनाथ कोळी या भाजपच्या उमेदवार विजयी झाल्या आहे. त्यांच्या पॅनलच्या ६ जागा निवडून आल्या आहे.

Back to top button