नाशिक : विहिरीत पडलेल्या ८० वर्षीय वृद्धास आपत्ती व्यवस्थापन पथकाने दिले जीवदान | पुढारी

नाशिक : विहिरीत पडलेल्या ८० वर्षीय वृद्धास आपत्ती व्यवस्थापन पथकाने दिले जीवदान

नाशिक, पुढारी वृत्तसेवा :  निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारात रविवारी (दि.४) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विहिरीमध्ये पाय घसरून पडलेल्या एका ८० वर्षीय वृद्धास चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने जीवदान दिले आहे. अवघ्या काही मिनिटांत आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेल्या बचाव कार्याची तालुकाभर कौतुक केले जात आहे.

चांदोरी येथील नाठे वस्तीवरील धोंडीराम भालचंद्र नाठे (वय ८०) हे त्यांच्या घराजवळून जात असताना ते विहिरीत पडले. त्यानंतर धोंडीराम नाठे यांनी मदतीसाठी आकांत फोडला. मोठमोठ्याने आवाज देऊ लागले,आरडा ओरड करू लागले, त्यांचा आवाज गणेश गोरख नाठे यांनी ऐकू येताच धावत गेले. त्यांनी विहिरीत आजोबांना वाचविण्यासाठी उडी घेतळी, परंतु त्यांना पोहता येत नसल्याने त्यांनी मदतीसाठी आवाज दिले.

यावेळी रोशन संजय टर्ले यांनी आवाज ऐकताच विहिरी जवळची परिस्थिती पाहून तत्काळ चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख सागर गडाख यांच्याशी संपर्क साधला. आपत्ती व्यवस्थापन पथक काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाले. पथक प्रमुख सागर गडाख दौलत टरले किरण वाघ राजेंद्र टर्ले, विलास सूर्यवंशी, सुभाष फुलारे,संजय गायखे यांनी तत्काळ घटनास्थळी बचाव कार्य सुरू करत दोघांना सुखरूप बाहेर काढून दोघांचे प्राण वाचवले. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या ह्या तत्काळ बचाव कार्यामुळे चांदोरी आणि परिसरातून कौतुक व्यक्त केले जात आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button