जीव वाचवण्यासाठी समुद्रात घेतलेली उडी आणि ऑलिंपिकचं लक्ष्य… वाचा या दोन बहिणींचा प्रेरणादायी प्रवास | पुढारी

जीव वाचवण्यासाठी समुद्रात घेतलेली उडी आणि ऑलिंपिकचं लक्ष्य... वाचा या दोन बहिणींचा प्रेरणादायी प्रवास

अमृता पाटील :

पुढारी ऑनलाईन डेस्क :  असं म्हणतात स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात. तर स्वप्न जी तुम्हाला झोपू देत नाहीत. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सगळेच करतात. पण अगदी जीवावर बेतलं असतानाही केवळ आणि केवळ स्वप्न पूर्ण करणाऱ्या व्यक्ती अनेकांची प्रेरणा बनतात. पण त्या स्वप्नापर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रवास जीवावर बेतणारा असेल तर ? अशीच गोष्ट आहे सारा आणि यूसरा मारदिनी या बहिणींची.

इतर कोणत्याही भावंडाप्रमाने असलेल्या यूसरा आणि साराचं आयुष्य त्यावेळी बदललं ज्यावेळी सिरियामध्ये गृहयुद्धाचा भडका उडाला. वयाच्या नवव्या वर्षापासून ऑलिंपिकमध्ये भाग घेण्याच स्वप्नं यूसराने पाहिलं होतं. वडिलांच्या हाताखाली प्रशिक्षण सुरू असताना 2011 मध्ये सिरियात गृहयुद्ध पेटलं. 2013 मध्ये या दोन्ही बहिणींचं घर शेलिंगमध्ये उद्धवस्त झालं. आसरा नाही, शाळेची अवस्था नीट नाही जिथे स्विमिंग पूलाची अवस्था कल्पना न केलेली बरी. 13 वर्षांच्या युसराचं आयुष्य जवळपास विरूद्ध दिशेत बदलून गेलं होतं.

Europe migrant crisis: Sister of Syria star swimmer Yusra Mardini arrested  in Greece - BBC News

यावेळी तिच्या मोठ्या बहिणीने निर्णय घेतला तो दोघींच्या आयुष्याला वेगळं वळण देणारा ठरला. साराने तिच्या इतर मित्र- मैत्रिणींप्रमाणेच युद्धक्षेत्रापासून लांब दुसऱ्या देशात जाण्याचा निर्णय घेतला. अर्थातच उद्ध्वस्त झालेली जन्मभूमी आणि कुटुंबीय यांना सोडून जाण्याचा निर्णय सोपा नक्कीच नव्हता. पण या दोन स्वप्नं आणि जगण्याच्या शोधात जीवावरच धाडस करण्यास उत्सुक होत्या. या दोघी बहीणींनी सिरियापासून जर्मनीपर्यंत तस्कर वापरत असलेल्या रस्त्याने जाण्याचं ठरवतात. अर्थात जवळपास 25 दिवसांचा हा प्रवास अनेक प्रकारे त्यांची परीक्षा पाहणारा ठरला.

तुर्कीला जात असताना 18 प्रवाशांनी भरलेल्या बोटीतून अवैधरित्या प्रवास करावा लागला होता. बोट एजियन समुद्रात मध्यावर असताना एंजिनमध्ये बिघाड झाला. अशावेळी दोन पर्याय होते. एकतर मदत मागणे किंवा जलसमाधी घेणं. अर्थात दोन्ही पर्यायांना दोघी बहीणींची तयारी नव्हती. अशा वेळी अंगी असलेलं पोहण्याचं कौशल्य वापरत स्वत:चा आणि सहप्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी या दोघीही समुद्रात उतरल्या स्वत: पोहत बोटीला दिशा दिली आणि स्वत:चा जीवही वाचवला.

जवळपास तीन तासाहून अधिक काळ या दोघी अजस्त्र समुद्रात पोहत होत्या. हाच प्रसंग पुढे यूसराची ऑलिंपिक प्रेरणा बनला. यानंतर रेफ्युजी कॅम्पमध्ये राहून, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करून, लोकल क्लबमधून प्रशिक्षण घेऊन यूसरा 2016 च्या रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊ शकली. विशेष म्हणजे ज्या रेफ्यूजी कॅम्पने तिला परक्या देशात आसरा दिला. ऑलिंपिकमध्ये तिने या आणि अशा अनेक रेफ्यूजी कॅम्पचं प्रतिनिधित्व केलं.

2022 च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये तिला सिरियाकडून उतरण्याची संधी असतानाही तिने पुन्हा रेफ्यूजी कॅम्पचीच निवड केली हे विशेष. सध्या ती कॅलिफोर्नियामध्ये फिल्म आणि टेलिव्हिजनशी संबंधित कोर्स करते आहे. याशिवाय युनायटेड नेशन्सची सदिच्छा राजदूत म्हणूनही काम करते आहे.

Back to top button