नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क :
सोलापूरात कर्नाटक भवन उभारणार अशी घोषणा कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. बोम्मई यांच्या या घोषनेनंतर संजय राऊत यांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. सोलापूरात कर्नाटक भवन उभारण्यासाठी आम्हाचा विरोध नाही, मात्र सीमाभागांतील गावांवर हक्क सांगण्यासाठी सोलापूरात भवन उभारणार असाल तर त्याआधी आम्हाला देखील बेळगाव व बंगळुरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यावी, त्यानंतर कर्नाटकचा विचार करु असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत हे नाशिक दौ-यावर आहेत. याठिकाणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, आपला देश हा अनेक राज्यांनी बनला आहे. ही काही संस्थाने नाही हे राज्य आहे. प्रत्येक राज्याचे एकमेकांशी प्रेमाचे संबंध आहे. कर्नाटकसोबत देखील आपले प्रेमाचे संबंध आहे. मुंबईत देखील अनेक राज्यांची भवने आहेत. देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकून ठेवण्यासाठी तसे करायला हरकत नाही. पण, जर सोलापूरात कर्नाटक भवन उभारले जाणार असेल तर आमची देखील बेळगाव व बंगळुरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची अनेक वर्षापासून इच्छा आहे. आधी त्यासंदर्भात निर्णय व्हावा, मग आम्ही तुमचा विचार करु असे संजय राऊत यांनी बोम्मई यांना सुनावले आहे.
यावेळी बोलताना, आपले मुख्यमंत्री गुवाहाटीला नवस फेडण्यासाठी गेेले होते, तेथून आल्यावर त्यांनी महाराष्ट्रात आसाम भवन उभारण्याची घोषणा केल्याचे मी ऐकले असल्याचे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात सध्या शिवप्रेमाच्या ढोंगाची लाट आहे. मी ज्यांना गद्दार म्हटले त्यांनी मला शिव्या दिल्याचे ऐकले. अनेकांना उत्तम शिव्या येतात त्यांनी त्या छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांचा अपमान करणा-यांना द्याव्यात. त्यांच्यावर आम्ही फुलं उधळू, त्या शिव्याचं महाराष्ट्र स्वागत करेल असेही राऊत म्हणाले.