मंत्रालयासमोर कांदे फेकून आंदोलन करण्याचा इशारा, लासलगावी शेतकरी संतप्त | पुढारी

मंत्रालयासमोर कांदे फेकून आंदोलन करण्याचा इशारा, लासलगावी शेतकरी संतप्त

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  
कांद्याच्या भावात मोठी घसरण सुरू असून चांगला भाव मिळेल या अपेक्षेने साठविलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले. यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आक्रमक होत कांद्याला प्रति किलो 30 रुपये देण्याची मागणी केली.

कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार रुपयांच्या जवळपास आल्याने शेतकरी कांदा उत्पादक संघटना आक्रमक झाली आहे. संतप्त शेतक-यांनी लिलाव बंद पाडले. बाजारभाव घसरणीचा निषेध करत कांद्याचे बाजार भाव न सुधारल्यास मंत्रालयासमोर कांदे फेकून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात आज कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून गेल्या आठवड्यात कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2500 रुपये भाव मिळत होता. त्यात तब्बल 1300 ते 1500 रुपयांपर्यंत घसरण होऊन आज कांद्याला सरासरी 1000 इतकाच भाव मिळत आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत कांदयाला किमान प्रति किलो 30 रुपये भाव देण्याची मागणी केली. अन्यथा मंत्रालयावर मोर्चा काढून कांदे फेकून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

हेही वाचा :

Back to top button